IND vs ENG 3rd D/N Test Day 2: अहमदाबाद पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने (England) दिलेल्या 49 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान टीम इंडियाने (Team India) दणदणीत विजय मिळवला आहे आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलची सलामी जोडी नाबाद परतली. रोहित 25 धावा तर शुभमन 15 धावा करून नाबाद परतले. तिसऱ्या अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामन्यातील विजयासह भारतीय संघाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचा आशाही पल्लवित आहेत, तर इंग्लिश टीमचे आव्हान संपुष्टात आले आहेत. जो रूटच्या इंग्लंड संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताविरुद्ध 3-1 असा विजय मिळवणे गरजेचे होते मात्र, यजमान संघाच्या आघाडीसह पाहुणा संघ आता चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही. (IND vs ENG 2nd Test Day 2: ‘कॅप्टन’ विराटची कमाल! अहमदबाद टेस्ट सामन्यात कोहलीने MS Dhoni यालाही सोडलं पिछाडीवर, बनला भारतातील यशस्वी कर्णधार)
दरम्यान, टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 3 बाद 99 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण पहिल्या सत्रात 145 धावांपर्यंतच मजल मारू शकली. रोहित शर्माने सर्वाधिक 66 धावा केल्या तर इंग्लिश कर्णधार रूटने 5 विकेट घेतल्या. जॅक लीचला 4 आणि जोफ्रा आर्चरला 1 विकेट मिळाली. यानंतर, दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. अक्षर पटेलने इंग्लंड फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवलं आणि सामन्यात पाहल्यांदा 10 पेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. अक्षरने अहमदाबाद सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या. विकेट शिवाय, अक्षरने आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात सलग तिसऱ्यांदा पाच विकेट घेतल्या. यापूर्वी, भारताचा पहिला डाव 53.2 ओव्हरमध्ये 145 धावांवर होता आणि इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर संपुष्टात आल्याने भारताने पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती.
दुसरीकडे, इंग्लंड आणि यजमान भारतीय संघ आता मोटेरावरील याच मैदानावर मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी आमने-सामने येतील. भारताने सामना जिंकल्यास मालिका खिशात घालतील किंवा इंग्लंडने बाजी मारल्यास मालिका अनिर्णीत राहील.