IND vs ENG 2nd Test: वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत कोहलीने फिरकीपटू रवींद्र जडेजा याच्याकडे सोपवला बॉल, ICC चे नवीन धोरण ठरले मुख्य कारण
विराट कोहली व रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडविरुद्ध (England) ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords) मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया (Team India) चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात वेगवान गोलंदाजांसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल होती. आकाश ढगाळ होते आणि फ्लड लाईट चालू होते. यानंतरही विराट कोहलीला  (Virat Kohli) फिरकीपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्याकडून गोलंदाजी करावी लागली. विराट कोहलीच्या या निर्णयामागे मुख्य कारण स्लो गोलंदाजी आहे. इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहम येथील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. यामुळे दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन नियमांनुसार चार गुण देण्यात आले परंतु स्लो ओव्हर रेटमुळे दोन्ही संघाने चार पैकी दोन गुण गमावले. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सच्या बाल्कनीत Virat Kohli ने केला नागीन डान्स, सहकाऱ्यांनाही फुटले हसू, पाहा व्हायरल Photo)

इंग्लंड दौऱ्यावर खेळला जाणारा प्रत्येक कसोटी सामना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. अशा परिस्थितीत, पुढील दोन वर्षांच्या सायकलमधील प्रत्येक गुण संघासाठी महत्वपूर्ण आहे. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर गवताच्या पट्ट्या होत्या आणि फिरकी गोलंदाजीसाठी काहीच दिसत नव्हते. अशा परिस्थितीत दोन्हीकडून वेगवान गोलंदाजांची गरज होती. यानंतरही कोहलीला जडेजाकडून गोलंदाजी करावी लागली. याचे कारण आयसीसीचे ओव्हर रेट्सवरील नॉन टॉलरन्स धोरण आहे. जडेजा नर्सरी एंडच्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी आला. मात्र, त्याने केवळ चार ओव्हर गोलंदाजी केली. यानंतर मोहम्मद शमी त्याच्या जागी गोलंदाजी करण्यासाठी आला. आणि चेंडू हातात येताच त्याने रोरी बर्न्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडला सुरुवातीचे सलग चेंडूवर दोन झटके दिले, ज्यामुळे यजमानांनी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारचा खेळ संपेपर्यंत तीन बाद 119 धावा केल्या. सिराजने 34 धावांत दोन विकेट्स काढल्या आहेत. यापूर्वी, जेम्स अँडरसनने भारतीय फलंदाजांवर अंकुश लावला 62 धावा देत पाच विकेट्स काढल्या व भारताचा पहिला डाव 364 धावांवर गुंडाळला.