IND vs ENG 1st test Day 1: चेन्नई येथे पहिल्या सत्रात दोन झटके बसल्यावर कर्णधार जो रूट (Joe Root) आणि डोम सिब्ली (Dom Sibley) यांनी भारताविरुद्ध (India) दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा (England) डाव सावरला. दोंघांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या चहाच्या वेळेपर्यंत संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 2 बाद 140 धावा केल्या आहेत. सिब्ली 53 नाबाद धावा आणि रूट नाबाद 45 धावा करून खेळत आहे. भारतासाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. इंग्लिश टीमचे दोन्ही फलंदाज मैदानात सेट झाले असून टीम इंडिया (Team India) गोलंदाजांसमोर ही जोडी फोडण्याचे आव्हान आहे. आजपासून सुरु झालेल्या भारत आणि इंग्लंड संघातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉरी बर्न्सने 33 तर डॉम लॉरेन्स शून्यावर माघारी परतला. (IND vs ENG 1st Test Day 1: जसप्रीत बुमराहचे भारतात टेस्ट डेब्यू, इंग्लंड फलंदाजाला माघारी पाठवत देशात घेतली पहिली कसोटी विकेट, पहा Video)
इंग्लंडने पहिल्या सत्रापर्यंत 2 विकेट्स गमावून 67 धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी बर्न्स आणि डॉम सिब्लीच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची अर्धशतकी भागीदारी केली मात्र, नंतर अश्विन आणि बुमराहने पहिल्या सत्राच्या शेवटच्या काही ओव्हर्स शिल्लक असताना दमदार कमबॅक करत इंग्लंडला 2 धक्के दिले. अश्विनने बर्न्सला 33 धावांवर तर भारतात पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या बुमराहने लॉरेन्सला शून्यावर माघारी धाडलं. मात्र, दुसऱ्या सत्रात रुट आणि सिब्लीने इंग्लंडचा डाव सावरला आणि लंच ब्रेकनंतर संघाला स्थिरता दिली. या दरम्यान सिब्लीने संयमी डाव खेळत झुंजार चौथे अर्धशतक पूर्ण केले.
चेन्नई येथील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे पुनरागमन झाले असून फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमला दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, इंग्लंडसाठी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचे कमबॅक झालं आहे. दोन्ही धाकड गोलंदाजांना श्रीलंका दौऱ्यावर इंग्लिश संघातून विश्रांती दिली होती.