रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा (Photo Credit: FacebooK)

IND vs ENG 1st Test Day 4 Stats: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील पहिल्या चेन्नई टेस्टच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात इंग्लंड 178 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड फलंदाजांना त्यांचा नैसर्गिक खेळ करू दिला नाही. जो रूटने संघासाठी सर्वाधिक 40 धावा केल्या. अशाप्रकारे, टीम इंडियाला (Team India) सामन्याचा अंतिम दिवस शिल्लक असताना 420 धावांचं आव्हान मिळालं आहे. कर्णधार जो रूट वगळता एकही इंग्लिश फलंदाज 30 धावसंख्या पार करू शकला नाही. आजच्या सामन्यात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), इशांत शर्मा अशा भारतीय गोलंदाजांनी आक्रमक भूमिका घेत पाहुण्या संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. अश्विनने 3 तर शाहबाझ नदीमला 2 विकेट मिळाल्या. यादरम्यान, चौथ्या दिवशी काही महत्वपूर्ण रेकॉर्ड बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 1st Test Day 4: भारतीय गोलंदाजांचा इंग्लंडला दे घुमा के, दिवसाखेर टीम इंडियाला विजयासाठी आणखी 381 धावांची गरज)

1. कपिल देव आणि झहीर खान यांच्यानंतर 300 कसोटी विकेट्स टप्पा गाठणारा इशांत शर्मा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. अनिल कुंबळे, हरभजन सिंह आणि आर अश्विन या फिरकीपटूंनीही 300 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

2. अश्विनने दुसऱ्या डावात सलामी फलंदाज रोरी बर्न्सला अजिंक्य रहाणेकडे झेलबाद केलं आणि पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा 100 हुन अधिक वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. असा पराक्रम करणारा अश्विन पहिला भारतीय आहे.

3. वॉशिंग्टन सुंदरने मायदेशात आणि परदेशात आपल्या कसोटी पदार्पणाच्या पहिल्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला.

4. घरच्या मैदानावर एकाच डावात सगळे भारतीय फलंदाज झेलबाद होण्याची नामुष्की टीम इंडियावर तब्बल 20 वर्षांनी ओढवली. यापूर्वी 2001 मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व भारतीय फलंदाज झेलबाद झाले होते.

5. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरला 5 धावांवर आऊट करत अश्विनने कसोटी सामन्याच्या एका डावात 28 वेळा 5 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा केला आहे.

6. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेटच्या बाबतीत अश्विनने इंग्लंडचा माजी खेळाडू इयन बोथमला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये बोथमने 383 तर अश्विनच्या नावावर आता 386 टेस्ट विकेट्स झाले आहेत.

दरम्यान, पहिल्या चेन्नई टेस्ट सामन्यात विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला आता अखेरच्या दिवशी आणखी 381 धावांची गरज असून चौथ्या दिवसाखेर रोहित शर्माच्या रूपात त्यांना पहिला धक्का बसला. फिरकीपटू जॅक लीचचे रोहितला 20 चेंडूत एका षटकार आणि एका षटकारासह 12 धावांवर माघारी धाडलं.