जो रूट (Photo Credit: Twitter/@englandcricket)

IND vs ENG 1st Test 2021: टेस्ट करिअरमधील 100वा सामना खेळणारा इंग्लंड (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) भारताविरुद्ध (India) चेन्नई (Chenni) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यंदाचे आपले दुसरे दुहेरी शतक ठोकले. इतकंच नाही तर शंभराव्या टेस्ट सामन्यात द्विशतकी धावसंख्या गाठणार रूट पहिलाच फलंदाज ठरला. इंग्लंडला मजबूत स्थितीत आणण्यात रूटच्या खेळीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रूटने पहिल्या दिवसापासून टीम इंडिया (Team India) गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला. रूटने पहिले डॉम सिब्लीसह 200 आणि दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्ससह शतकी भागीदारीने सामन्यात इंग्लंड संघाला मजबुती मिळवून दिली. यापूर्वी, रूटने शानदार दीडशे धावा पूर्ण करत कसोटी क्रिकेटमध्येही मोठा कारनामा नोंदवला. 2010नंतर सर्वाधिक वेळा कसोटी क्रिकेटमध्ये 150 किंवा त्याहून अधिक खेळी करणारा रूट जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. (Virat Kohli, Rohit Sharma’s Picture Turns Into Meme Fest: विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या चेन्नई टेस्ट सामन्यातील ‘त्या’ फोटोवर मिम्स व्हायरल, पहा Tweets)

या प्रकरणात, रूट देशाचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि भारताचा स्टार विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रूटच्या अगोदर, कूक आणि कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 10 वेळा दमदार दीडशे किंवा अधिक धावांची खेळी केली आहे. श्रीलंकानंतर भारताविरुद्ध द्विशतकी खेळी रूटसाठी खास ठरली. 100व्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांच्या बाबतीत इंझमाम-उल हक यांच्या नाबाद 188 धावांच्या खेळीला मागे टाकले आणि सार्वधिक धावसंख्या नोंदवली. माजी पा बेंगलोर येथे भारताविरुद्ध 2004/05 मध्ये 184 धावा केल्या होत्या. या एलिट यादीत आता रूटने मानाचे स्थान पटकावले आहे. दरम्यान, चेन्नई सामन्यात कर्णधार रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रूट 128 धावा करुन नाबाद परतला होता. यानंतर, दुसर्‍या दिवशी रूटने बेन स्टोक्ससह संघाला डावात आघाडी मिळवून दिली आणि 150 धावा पूर्ण केल्या.

इंग्लंड कर्णधाराने भारताविरुद्ध केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. शिवाय, एखाद्या क्रिकेटपटूने आपल्या 98व्या, 99व्या आणि 100व्या कसोटी सामन्यात 100 पेक्षा अधिक धावा करण्याचीही पहिलीच वेळ आहे. रूटने रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर षटकार खेचत 341 चेंडूत 201 धावसंख्या गाठली. रूटचे कसोटी क्रिकेटमधील हे 5वे तर कर्णधार म्हणून तिसरे 3 दुहेरी शतक ठरले.