IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली-इशांत शर्मा यांचा प्रभावी मारा, दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडिया विजयापासून 4 विकेट दूर
इशांत शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: IANS/Getty)

कोलकाताच्या ईडन गार्डनवर भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे आणि टीम इंडिया विजयापासून फक्त 4 विकेट दूर आहे. या कसोटी सामन्यात बांग्लादेशचा संघ पहिल्या डावात 106 धावांवर ऑल आऊट झाला. याच्या प्रत्युत्तरात भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केला. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 241 धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा बांग्लादेशने 6 बाद 152 धावा केल्या होत्या. मुशफिकुर रहीम (Mushtfiqur Rahim) नाबाद 59 धावांवर खेळत आहेत. बांग्लादेश भारताच्या पहिला डावाच्या अजून 89 धावा मागे आहे. भारताने डाव घोषित केल्यावर इशांत शर्मा (Ishant Sharma) याने आपली उत्तम कामगिरी सुरूच ठेवली आणि दुसऱ्या डावात बांग्लादेशच्या 4 फलंदाजांना माघारी धाडले. उमेश यादव (Umesh Yadav) याला 2 विकेट मिळाले. दुसर्‍या डावात बांग्लादेशची सुरुवात खराब झाली आणि संघाचा सलामी फलंदाज शादमन इस्लाम (Shadman Islam) खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. इशांतने यानंतर बांग्लादेशी कर्णधार मोमिनुल हक (Mominul Haque) आणि इमरूल कायस (Imrul Kayes) यांना माघारी धाडले. त्यानंतर उमेश यादव याने मोहम्मद मिथुन याला 6 धावांवर बाद केले. (विराट कोहली याला बाद करण्यासाठी तैजुल इस्लाम याने हवेत पकडलेला अप्रतिम झेल पाहून टीम इंडियाचा कर्णधारही झाला अवाक, पाहा Video)

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे जेव्हा क्रीजवर आला तेव्हा भारताची धावसंख्या 174 धावांमध्ये तीन विकेट गमावल्या होत्या, पण पुढच्या काही ओव्हरमध्ये त्यांनी शानदार फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या 200 च्य पार नेली. त्यानंतर उपकर्णधार रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने 65 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 22 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. रहाणेच्या रुपात भारताला चौथा धक्का बसला. रहाणे 69 चेंडूंत 7 चौकारांसह 51 धावा फटकावत तैजुल इस्लाम याच्या गोलंदाजीवर कॅच आऊट झाला. यानंतर कर्णधार विराटने 159 चेंडूत 27 चौकारासह 27 वे कसोटी शतक पूर्ण केले. लंचनंतरच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजा याला अबू जायद याने 12 धावा बोल्ड केले. दुसर्‍या दिवशी लंच संपल्यानंतर थोड्याच वेळात विराट कोहलीनेही नवीन बॉलसह विकेट गमावली. 194 चेंडूत 136 धावा करून इबादत हुसेन याच्या चेंडूवर विराट कॅच आऊट झाला. तैजुलने विराटला बाद करण्यासाठी लॉन्ग ऑन वर हवेत उडी मारत अप्रतिम झेल पकडला. बांगलादेशकडून पहिल्या डावात अल-अमीन-हुसेन आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले, तर अबू जायदने दोन आणि तैजुलने एक गडी बाद केला.

यापूर्वी, ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार मोमीनुल हक याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण इशांत शर्मा आणि उर्वरित भारतीय वेगवान गोलंदाजीच्या पुढे बांग्लादेशी संघ 106 धावांवर ऑल आऊट झाला.