विराट कोहली याला बाद करण्यासाठी तैजुल इस्लाम याने हवेत पकडलेला अप्रतिम झेल पाहून टीम इंडियाचा कर्णधारही झाला अवाक, पाहा Video
(Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपला अप्रतिम खेळ करत शतकी कामगिरी केली. विराटने ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या मॅचमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आणि संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यास महत्वाची भूमिका बजावली. बांग्लादेशला पहिल्या दिवशी 106 धावांवर ऑल आऊट केल्यावर भारताने दुसऱ्या दिवशी लंचनंतर 6 बाद 310 धावा केल्या आहे. दुसऱ्या दिवशी विराटची खेळी महत्वाची ठरली. पण, या सर्वांमध्ये बांग्लादेशी तैजुल इस्लाम (Taijul Islam) याने विराटला बाद करण्यासाठी पकडलेला झेल चर्चेचा विषय बनला. इबादत हुसेन याच्या चेंडूवर कोहली 136 धावांनंतर तैजुलच्या हाती झेलबाद झाला. कर्णधार विराटच्या ईडन गार्डन्सवरील खेळीने भारत आणि बांग्लादेशमधील या मॅचला संस्मरणीय बनवले.

81 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर कोहलीने डीप-लेगवर शॉट खेळला, पण तैजुलने उजव्या बाजूला उडी मारत कोहलीचा हवेत एक आश्चर्यचकित करणारा कॅच पकडला आणि भारतीय कर्णधाराला 136 धावांवर माघारी धाडले. कोहलीने त्याच्या या खेळीदरम्यान 194 चेंडूंचा सामना खेळ. तैजुलने पकडलेला कॅच पाहून स्वतः विराटही अवाक झाला आणि आश्चर्यचकित अशी प्रतिक्रिया देत मैदानाबाहेर गेला.  पाहा तैजुलने पकडलेला 'हा' अप्रतिम झेल:

पहिल्या दिवशी बांग्लादेशला 106 धावांवर बाद केल्यावर भारताने पहिल्या डावांत फलदांजी करत 222 धावांची आघाडी घेतली आहे. विराटने शतकी खेळी केली, तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी योगदान दिले. पुजाराने 55 तर रहाणेने 51 धावा केल्या. रवींद्र जडेजा याला 12 धावांवर अबू जायद याने बोल्ड करत पॅव्हिलिअनमध्ये पाठवले. कोहली आणि रहाणे यांच्यात 99 धावांची भागीदारी झाली असताना रहाणे बाद झाला. दुसरीकडे, विराटने या खेळीदरम्यान कर्णधार म्हणून 20 वे तर टेस्टमधील 27 शतक केले. शिवाय, विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 70 वे शतक ठरले. यापूर्वी, दोन्ही संघात झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता.