मोहम्मद शमी (Photo Credit: IANS)

इंदोरमध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश (Bangladesh) चा पराभव होण्याचा धोका आहे. आज या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस असून हा सामना आज संपेल असे दिसत आहे. बांग्लादेशच्या कमकुवत संघासमोर भारताने (India) मोठी धावसंख्या उभारली आहे. बांग्लादेशने दुसर्‍या डावात 22 षटकांत 4 गडी गमावून 60 धावा केल्या आहेत. बांगलादेश दुसऱ्या डावात भारताच्या 283 धावा मागे आहेत. बांग्लादेशविरुद्ध पहिला सामना जिंकण्यापासून टीम इंडिया आता 6 विकेट दूर आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 343 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघाला 10 धावांवर पहिला धक्का बसला. इमरुल कायास याला 6 धावांवर उमेश यादव याने बोल्ड केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. नंतर 16 धावांवर इशांत शर्मा याने शादमान इस्लाम याला 6 धावांवर बोल्ड करत माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार मोमिनुल हक मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या गोलंदाजीवर 7 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्यानंतर शमीने मोहम्मद मिथुन याला  मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्या हाती 18 धावांवर कॅच आऊट केले.

पहिल्या डावात 150 धावांवर ऑल आऊट झालेल्या बांग्लादेश संघाची चिंता भारतीय संघाने वाढवली. भारतीय संघाने 493 धावा करून डाव घोषित केला आहे. अशा परिस्थितीत बांग्लादेशसमोर 343 धावांचा मोठा स्कोर आहे. संघाने जर ही धावसंख्या ओलांडली तर टीम भारतासमोर लक्ष्य ठेवेल. इंदोरमध्ये सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताचा सलामी फलंदाज मयंक अगरवाल याच्या दुहेरी शतकाच्या जोरावर भारताने 6 गडी गमावून 493 धावा केल्या. तिसर्‍या दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार विराट कोहली याने डावाची घोषणा केली.

लंचपर्यंत भारताकडून शमीने 2, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. दुसऱ्या डावात बांग्लादेशचे पहिले तीन फलंदाज एक अंकी धावांवर बाद झाले. मिथुनने 18 धावा केल्या.