IND vs AUS 2nd ODI: शिखर धवन याच्या बरगड्यांना दुखापत, मैदानात 'या' खेळाडूने घेतली जागा
शिखर धवन (Photo Credits: Getty)

टीम इंडियामधील (India) खेळाडूंच्या दुखापतीने सत्र काही केल्या थांबत नाही. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात रिषभ पंतनंतर दुसऱ्या सामन्यात सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) यालाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे. शिखरच्या बरगड्यांना फलंदाजीदरम्यान दुखापत झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्या जागेवर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यादरम्यान फलंदाजीदरम्यान यष्टीरक्षक पंतच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं. राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात सलामी जोडी रोहित शर्मा आणि धवनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या डावात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स (Pat Cummins) याने 10 वी टाकली. पहिल्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली, धवनने दुसरा चेंडू खेळला. कमिन्सने त्याला शॉर्ट बॉल टाकला. धवन तो चेंडू लेग साईडला पूल करण्याचा प्रयत्न करत होता, चेंडू जास्त बाउंस झाला आणि त्याच्या एल्बोला लागून बरगड्यांना लागला. (Video: अ‍ॅडम झांपा ने पाचव्यांदा केले विराट कोहली याला आऊट, मिशेल स्टार्क-एश्टन एगर यांनी मिळून पकडलेला कॅच पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह-वाह')

धवनला चेंडू इतका जोरात लागला की धाव पूर्ण केल्यावर थोड्यावेळ खेळपट्टीवरच आडवा झाला, मग उठला आणि खेळायला सुरूवात केली. धवनने एकदिवसीय कारकीर्दीतील 60 चेंडूत 29 वे अर्धशतक पूर्ण केले. मालिकेतील हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक होते. मात्र, त्याचे केवळ 4 धावांनी शतक हुकले आणि 96 धावा काढून तो झेलबाद झाला.

दरम्यान, पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित आणि धवनच्या जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. अ‍ॅडम झांपाने रोहितला 42 धावांवर बाद करत भारताची सलामी जोडी फोडली. यानंतर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. धवनने 90 चेंडूच्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. विराट आणि धवनने दुसर्‍या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली.