IND vs AUS Test 2020-21: बॉक्सिंग डे टेस्ट खेळण्यास डेविड वॉर्नर उत्सुक, भारताविरुद्ध पूनरागमना संदर्भात केला 'हा' दावा
डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty Images)

IND vs AUS Test 2020-21: भारताविरुद्ध (India) अ‍ॅडिलेड (Adelaide) कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) डेविड वॉर्नर (David Warner) शिवाय मैदानावर उतरला आहे. दुखापतीमुळे पहिला पिंक-बॉल टेस्ट खेळण्यास असर्मथ असलेला वॉर्नर निराश असून त्याने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये (Melbourne Cricket Ground) होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी (Boxing Day Test) संघात पुनरागमन करण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. 34 वर्षीय वॉर्नरला दुसर्‍या वनडे सामन्यात ग्रॉइन दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला अंतिम सामना, संपूर्ण टी-20 मालिका आणि पहिल्या टेस्ट सामन्याला मुकावे लागले होते. वॉर्नरने मेलबर्न टेस्टबद्दल ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स रेडिओ नेटवर्क SEN ला सांगितले की, "मला आशा आहे की, बॉक्सिंग डे कसोटीतून मला बाहेर पडायचे नाही. दुखापतीमुळे मी पहिल्यांदाच कसोटी सामन्यातून बाहेर पडलो आहे, अर्थातच यातून मी निराश आहे. ही एक मोठी मालिका आहे, कसोटी सामन्यात न खेळणे निराशाजनक आहे परंतु मला माहित आहे की आज मैदानात उतरलेले खेळाडू उत्तम कामगिरी करतील."

वॉर्नरला ऑस्ट्रेलियाकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. स्टार सलामीवीर म्हणाला, "आम्हाला आशा आहे की आम्ही बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी मालिका चांगली सुरू करू आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू आणि नवीन वर्षात लयी सोबत जाऊ." पुनर्वसन सुरू असलेल्या वॉर्नरने सांगितले की प्रशिक्षणाची पातळी अधिक कडक करण्याची त्याची योजना आहे. तो म्हणाला, "मला आशा आहे की मी वेगवान धावू शकेन. सध्या मी ताशी 14 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे, म्हणून पुढील आठवड्यात ते 26 ते 30 किमी वेगाने आणण्याच्या दिशेने काम करावे लागेल." ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट दिनदर्शिकेतील सर्वात मोठा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.

बॉक्सिंग डे कसोटीसाठी आता अवघे नऊ दिवस शिल्लक आहे, त्यामुळे वॉर्नरला मैदानावर परतण्यासाठी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स सलामीला मैदानात उतरले आहेत.