IND vs AUS Head to Head: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा मालिका काबीज करण्याचा प्रयत्न, जाणून घ्या दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी
IND vs AUS (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या, 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. शुक्रवारी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मोहाली वनडेनंतर आता सगळ्यांचे लक्ष इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडेकडे लागले आहे. आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही एकदिवसीय मालिका टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोघांसाठी महत्त्वाचा आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd ODI Weather Report: दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कसे असेल इंदूरचे हवामान?)

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीच्या (51/5) घातक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 276 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने 8 चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये शुभमन गिलने 74, ऋतुराज गायकवाडने 71, केएल राहुलने नाबाद 58 आणि सूरकुमारने 50 धावा केल्या.

दोन्ही संघांमधील आतापर्यंत झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियापेक्षा जास्त एकदिवसीय सामने जिंकले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 147 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 82 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाने केवळ 55 सामने जिंकले आहेत. याशिवाय 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याच वेळी, मार्च 2023 मध्ये दोन्ही संघ शेवटच्या वनडे सामन्यात आमनेसामने आले होते. टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ही 3 सामन्यांची मालिका जिंकली होती. या मालिकेतील सर्व सामने भारतीय भूमीवरच खेळले गेले.

भारतीय भूमीवर यावर्षी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण भारतीय भूमीवर आत्तापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर ऑस्ट्रेलियाचे येथेही पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियाने भारताच्या यजमानपदावर एकूण 68 सामने खेळले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने येथे 32 सामने जिंकले आहेत.

एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये होणार आहे. तर या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवले जातील. खरे तर आयसीसी विश्वचषकापूर्वी ही मालिका टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे.