IND vs AUS 4th Test Day 3: वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरची 'गेमचेंजर' खेळी, टीम इंडियाची पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल, ऑस्ट्रेलियाकडे 33 धावांची आघाडी
वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test Day 3: वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ब्रिस्बेन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (Brisbane) 111.4 ओव्हरमध्ये त्रिशतकी धावसंख्या गाठली आणि 336 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या जोरावर 33 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडिया (Team India) बॅकफूटवर असताना शार्दूल आणि वॉशिंग्टनने गेमचेंजिंग खेळी करत संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं. आघाडीचे फलंदाज संघर्ष करत असताना दोंघांनी संघासाठी पहिल्या डावात मोठी भागीदारी केली आणि आपले पहिले कसोटी अर्धशतक ठोकले. दोघांना वगळता अन्य फलंदाज पन्नाशी धावसंख्या पार करू शकले नाही. शार्दूलने सर्वाधिक 67 धावा केल्या. सुंदरने 62 धावा फडकावल्या. दुसरीकडे, सुंदर-शार्दूलच्या जोडीला मोडण्यासाठी कांगारू गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. जोश हेझलवूडने (Josh Hazelwood) सर्वाधिक 5 तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. नॅथन लायनने 1 गडी बाद केला. (IND vs AUS 4th Test 2021: वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूर यांचा दे घुमा के! Gabba येथे रचली ऐतिहासिक भागीदारी)

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 2 बाद 62 धावांवरुन खेळणाया सुरुवात केली. पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे तर दुसऱ्या सत्रात मयंक अग्रवाल आणि रिषभ पंतही स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतले. आघाडीच्या फळीत रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावा केल्या. मयंकने 38 तर कर्णधार रहाणेने 37 धावांचे योगदान दिले. अशास्थितीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेऊन जाईल असे दिसत असताना शार्दूल-सुंदरच्या जोडीने आक्रमक पवित्रा घेतला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना लोळवलं. टीम इंडिया अडचणीत असताना दोघांनी संघाला त्रिशतकी धावसंख्या पार करून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. बॉलिंगनंतर मराठमोळ्या शार्दूलने झुंजार अर्धशतकी खेळी केली. शार्दूलचं कसोटीमधील पहिलं अर्धशतक ठरलं. सातव्या विकेटसाठी शार्दूल आणि वॉशिंग्टनच्या नवख्या जोडीने झुंजार शतकी भागीदारी करत डाव सावरला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली.

शार्दूलनंतर सुंदरने देखील डेब्यू सामन्यात अर्धशतक ठोकले. दोघांच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने 300 पार मजल मारली. शार्दूलने एकूण 115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह एकूण 67 धावांची खेळी केली. नवदीप सैनी 5 धावांवर बाद झाला तर सुंदरला स्टार्कने माघारी धाडलं.