IND vs AUS 3rd ODI: विराट कोहली ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिनच्या वरचढ! 12,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा बनला सर्वात जलद ‘रनमशीन’
विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd वनडे (Photo Credit: Twitter/BCCI)

Fastest to 12,000 ODI Runs: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टीम इंडियाने (Team India) वनडे मालिका गमावली असली तरी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल येथे सुरु असलेल्या सामन्यात 23 धावा करताच 'रनमशीन' म्हणून ओळखला जाणाऱ्या कर्णधार कोहलीने विश्वविक्रमाची नोंद केली. विराटने सर्वात जलद 12,000 वनडे धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. 32 वर्षीय विराट मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) वरचढ ठरला आणि सर्वात कमी 242 डावात ही कामगिरी करणारा फलंदाज बनला आहे. विराटने सचिनला मागे टाकले ज्याने 300 डावात 12,000 वनडे धावा केल्या होत्या. शिवाय, कोहलीच्या नावावर आधीपासूनच सर्वात जलद 8000, 9000, 10,000 आणि 11,000 धावा करण्याच्या विक्रमाची नोंद आहे. इतकंच नाही तर यापूर्वी, विराटने दुसऱ्या सामन्यात 89 धावांच्या डावादरम्यान सर्वात जलद 462 डावात 22,000 आंतरराष्ट्रीय धावांची नोंद केली होती. (IND vs AUS 3rd ODI: विराट कोहलीचा टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले मोठे बदल; टी नटराजनचे डेब्यू)

आजच्या सामन्यापूर्वी कोहलीने 250 एकदिवसीय सामन्यांच्या 241 डावात 59.29 च्या सरासरीने 11977 धावा केल्या होत्या. त्याने 43 शतके आणि 59 अर्धशतके झळकावली असून सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे ज्याने वनडे कारकीर्दीत 49 शतकं ठोकली आहेत. सचिन वगळता माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने एकदिवसीय कारकीर्दीत 314व्या डावात 12,000 धावा पूर्ण करण्याची आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 336 डावात, सनथ जयसूर्याने 379 डाव आणि महेला जयवर्धनेने 399व्या डावात 12,000 वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. अशा स्थितीत कोहलीने सर्वात कमी 241 डावात हा पराक्रम नोंदवला आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात विराटची नजर सचिनच्या आणखीन एका विक्रमवीर असेल. विराटने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ शतके ठोकली आहेत आणि सचिनची बरोबरी करण्यापासून एक शतक दूर आहे. कॅनबेरा येथे सुरु असलेल्या सामन्यात विराटने शतकझळकावल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो सचिनच्या नऊ शतकांची बरोबरी करेल.