विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरूमध्ये सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा विश्वविक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 धावा करताच विराटने इतिहास रचला आणि वनडेमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने 244 सामन्यांच्या 235 डावांमध्ये 59.70 च्या सरासरीने 11703 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने 43 शतकं आणि 56 अर्धशतकं ठोकली आहेत. कर्णधार म्हणून त्याने 85 सामन्यांच्या 81 डावांमध्ये 4983 धावा केल्या होत्या. आणि आता या सामन्यात 17 धावा करत विराटने कर्णधार म्हणून पाच हजार धावांचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून वेगवान 5000 धावा करण्याचा विक्रम यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने नोंदविला होता. त्याने 127 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र, विराटने हा महत्वाचा टप्पा फक्त 82 डावांमध्ये पूर्ण केला. राजकोटमध्ये मागील सामन्यात कोहलीने 78 धावा केल्या होत्या. (IND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याने वनडेमध्ये केली कमाल; सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांना मागे टाकत 'ही' कामगिरी करणारा तिसरा वेगवान फलंदाज)

आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग 131 डावांसह दुसर्‍या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ 135 डावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा सौरव गांगुली 136 डावांसह चौथा आणि मोहम्मद अझरुद्दीन 151 डावांत ही कामगिरी करत पाचव्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा करणारा विराट हा चौथा भारतीय आहे.

मुंबईतील वानखेडेमधील पराभवानंतर कोहलीच्या भारतीय संघाने संयम दर्शविला आणि राजकोटमध्ये प्रभावी खेळ करत 1-1 ने मालिकेत बरोबरी केली. आता मालिकेतील अंतिम सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य दिले आहे. माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या 131 धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.