ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 390 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाला 9 विकेट गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारला आली आणि 51 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) 89 धावांच्या तुफानी डावानंतर केएल राहुल (KL Rahul) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) जोडीने लढा दिला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताच्या धावगतीवर वेसण घातली आणि संघाचा धुव्वा उडवला. राहुलने 76 आणि हार्दिकने 28 धावा केल्या. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारीने संघाला विजयाच्या जवळ नेले पण विजयीरेषा पार करून देण्यास अपयशी ठरले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने (Pat Cummins) सर्वाधिक 3, जोश हेझलवूड आणि अ‍ॅडम झांपा यांना प्रत्येकी 2 तर ग्लेन मॅक्सवेल आणि मोईसेस हेनरिक्स यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd ODI: भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना प्रशिक्षक रवि शास्त्री घेत होते डुलकी, पाहा व्हायरल Photo)

यापूर्वी, शिखर धवन आणि मयंक अग्रवालच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. धवन 28 आणि मयंक 30 धावा करून माघारी परतले. विराट आणि श्रेयस अय्यर यांच्यातील भागीदारीने संघाला डाव सावरला, पण हेनरिक्सने श्रेयसला 38 धावांवर बाद करून जोडी मोडली. या दरम्यान विराटने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले आणि राहुलसह डाव पुढे नेला. विराट शतक करणार असे दिसत असताना हेझलवूडने भारतीय कर्णधाराला हेनरिक्सकडे झेलबाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. कर्णधार माघारी परतल्यावर राहुल आणि हार्दिक फटकेबाजी करत राहिले. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली, पण झांपाने राहुलला हेझलवूडकडे झेलबाद करत घातक जोडी मोडली. रवींद्र जडेजाने 24 धावा केल्या.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी स्टिव्ह स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत 104 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फिंच, डेविड वॉर्नर, मार्नस लाबूशेन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी उत्तम साथ दिली. तर, भारतीय गोलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि पांड्या यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.