Video: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये अ‍ॅडम झांपा याने आपल्याच चेंडूवर पकडला विराट कोहली याचा अफलातून कॅच
अ‍ॅडम झांपा, विराट कोहली (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिले फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला (Indian Team) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जबरदस्त खेळी करत 255 धावांवर ऑलआऊट केले. टीम इंडियासाठी शिखर धवन आणि केएल राहुल यांनाच फलंदाजीने प्रभाव पाडण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने यजमान भारतविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फिंचचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचे टॉप-ऑर्डर अपयशी राहिले. रोहित शर्मा 10 धावा करुन पॅव्हिलियनमध्ये परतला. शिखर आणि राहुलने डाव हाताळण्याचा प्रयत्न केला, पण धवन 74 आणि राहुल 47 धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा भारताला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झांपा (Adam Zampa) याने आपल्याच चेंडूवर विराटचा शानदार झेल पकडला आणि भारतीय कर्णधाराला स्वस्तात माघारी परतवले. (IND vs AUS 2020 1st ODI: टीम इंडिया 255 धावांवर ऑलआऊट, शिखर धवन याने केल्या सर्वाधिक 74 धावा)

कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो अपयशी ठरला. झांपाने विराटचा स्वत:ताच्या गोलंदाजीवर अफलातून झेल पकडला. 13 चेंडूत 16 धावांवर खेळताना विराटने जोरदार फटका मारला, पण झांपाने त्याचा झेल घेत त्याला माघारी धाडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील झांपाने विराटला बाद करण्याचीही चौथी वेळ होती. दरम्यान, बाद होण्यापूर्वी कोहलीने झांपाच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु पुढच्याच चेंडूवर त्याने विकेट गमावली. झांपाने फुर्ती दाखवत अतिशय शार्प कॅच पकडला.

ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेनने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियन भारतीय फलंदाजांवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. रोहितला स्वस्तात बाद केल्यावर धवन आणि राहुलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण दोघे बाद झाल्यावर भारताचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क याने सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर केन रिचर्डसन आणि पॅट कमिन्स यांनी 2 विकेट घेतल्या.