ICC WTC Final: टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धुमाकूळ घातलेल्या ‘या’ भारतीय फलंदाजाने इंग्लंडमध्ये खेळला आहे फक्त एकच सामना, Team India साठी ठरणार फायदेशीर?
रिषभ पंत आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

ICC WTC Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. भारताने एक बलाढ्य संघ निवडला आहे जो 18 जून रोजी साऊथॅम्प्टनच्या (Southampton) मैदानावर न्यूझीलंडशी (New Zealand) भिडेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान काबीज करणाऱ्या टीम इंडियासाठी शीर्षक सामना सोपा ठरणार नाही कारण त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड आहे ज्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांची मोठी फौज आहे. टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) मुख्य भूमिका बजावू शकतो. वनडे आणि टी-20 क्रिकेटचा खतरनाक फलंदाज रोहितने कसोटी क्रिकेटमध्येही मागील 2 वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. पण एक गोष्ट जी त्याच्या विरोधात जाते ती म्हणजे त्याला इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याचा फक्त एकच अनुभव आहे. (ICC WTC Final: भारताविरुद्ध WTC फायनल सामन्यात या 11 खतरनाक खेळाडूंना मैदानात उतरवू शकते किवी टीम)

रोहितची कसोटी कारकीर्द उत्कृष्ट आहे. ‘हिटमॅन’ने 38 कसोटी सामन्यांमध्ये 46.69 च्या सरासरीने 2615 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. शिवाय 2019-2021 दरम्यान रोहितने कमालीचा फॉर्म दर्शवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून रोहितने 2019 मध्ये 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील रोहितच्या प्रभावाविषयी दोन मते नाहीत, परंतु समस्या अशी आहे की इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटचा त्याला फारसा अनुभव नाही. तसेच स्विंग आणि बाउन्सी खेळपट्टीवर रोहितला अडचणींचा सामना करावा लागतो. रोहित इंग्लंडमधील एकमेव कसोटी सामन्यात फक्त 34 धावा करू शकला आहे. योगायोगाने, रोहितने हा सामना साऊथॅम्प्टनमध्ये झाला होता. अशा परिस्थितीत रोहित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेमध्ये फायदेशीर ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दुसरीकडे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत बोलायचे तर रोहित भारतीय संघासाठी 2019-2021 या कालावधीत धावांची हजारी पार करणारा दुसरा फलंदाज तर आशिया खंडातील वेगवान व पहिला सलामी फलंदाज ठरला आहे. रोहितने 11 टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यात 1030 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 17 सामन्यात 1095 धावा केल्या आहेत.