Team India (Photo: IANS)

एका आठवड्यापासून सुरु असणाऱ्या आईसीसी विश्वचषक (ICC Worldcup 2019)  सामन्यात आज टीम इंडिया आपल्या खेळाचा श्री गणेशा करणार आहे. कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि अपेक्षा घेऊन विराट ब्रिगेड 12 व्या विश्वचषक पर्वात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. आज दुपारी तीन वाजता भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) असा सामना इंग्लंड च्या दी रोज बाउल स्टेडियम मध्ये पार पडणार आहे.टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असल्याने विजयाची नांदी करण्यासाठी जोर लावला जाईल तर याआधी दक्षिण आफ्रिका संघाचा अगोदरच दोन वेळा पराभव झाला असल्याने अपयशाची हॅट्रिक होऊ नये यासाठी त्यांचेही शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

विश्वचषक सुरु होण्याआधी झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाचा काहीसा संमिश्र परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलँडच्या गोलंदाजासमोर भारताचा डाव 179 धावांत आटोपला होता.मात्र दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशच्या संघाला 359 धावांचे आव्हान दिले होते. काही दिवसांपूर्वी कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघाची तयारी झाली असून यंदा टीम मध्ये तरुण खेळाडू असल्याने ताकद वाढली आहे तसेच चॅम्पियन लीग 2017 मध्ये झालेल्या पराभवातून धडे घेऊन यंदा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असा विश्वास दर्शवला होता. ICC World Cup 2019 Team India Time Table: जाणून घ्या कधी, केव्हा आणि कुठल्या टीमसोबत भिडणार टीम विराटचे वीर

आजच्या सामन्याच्या संघ बांधणीत कोणाला मिळणार स्थान?

भारतीय संघात यंदा सर्वात जास्त नवोदित व तरुण खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. मात्र अद्याप आजच्या सामन्यातील संघाची बांधणी समोर आलेली नाही. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे स्थान निश्चित आहे.मात्र वेगवान गोलंदाज भुवनेश्वर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि यझुवेंद्र चहल यांच्यापैकी कोणाला  आजच्या सामन्यात खेळवले जाणार हे पाहणे रंजक ठरणार आहे, टीम इंडियाची फलंदाजीची बाजू नेहमीच बळकट म्हणून ओळखली जाते. फलंदाजीसाठी भारताचे पहिले सहा क्रमांक निश्चित आहेत. रोहित, धवन, विराट कोहली, राहुल, धोनी, हार्दिक पंड्या असा क्रमांक ठरला आहे. आता सातव्या स्थानासाठी केदार जाधव, रवींद्र जडेजा, विजय शंकर यापैकी कोणाची वर्णी लागणार हे अजून ठरलेले नाही.

यंदा शारीरिक दुखापतीमुळे विरोधी संघातील महत्वाचे खेळाडू म्हणजे हाशिम आमला, एबी डिव्हिलियर्सची खेळणार नसल्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो मात्र इंग्लंड मधील हवामानाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन टीम इंडिया नेमकी काय रणनीती ठेवून खेळणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.