टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test 2021: श्रीलंकाविरुद्ध इंग्लंड (England) संघाचा क्लीन-स्वीप आणि ऑस्ट्रेलियाचा 2-1 टीम इंडियाच्या (Team India) विजयानंतर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (Test Championship Points Table) मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या दोन स्थानांसाठी रस्सीखेच आणखी मनोरंजक झाली आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (ICC Test Championship) विजयाच्या टक्केवारीनुसार पहिल्या दोन संघाचा निर्णय घेतला जाईल. या क्रमवारीतील टॉप-2 संघ आगामी काळात टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामना खेळणार आहेत. इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानात (Lords Cricket Ground) 18 जून ते 22 जून दरम्यान फायनल खेळला जाणार आहे. ब्रिस्बेन येथील विजयानंतर टीम इंडियाने 71.7 टक्केवारीसह पहिले स्थान पटकावले आहे. न्यूझीलंड संघ द्वितीय क्रमांकावर असून भारताविरुद्ध पराभवाने ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडने नुकताच श्रीलंकाविरुद्ध विजयाने त्यांच्या गुणांची टक्केवारी 68.7%% इतकी झाली आहे. (IND vs ENG Test 2021: टीम इंडियापुढे इंग्लंडचे कडवे आव्हान; जो रूट, जेम्स अँडरसन यांना रोखण्याचे मोठे चॅलेंज, वाचा सविस्तर)

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर 5 फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि भारत यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका WTC च्या फायनलचा निर्णय घेण्यासाठी मोठी भूमिका निभावेल. विराटसेनेला इंग्लंडविरुद्ध 4-0, 3-0, 3-1 किंवा 2-0 अशी मालिका जिंकण्याची गरज आहे, शिवाय 0-3 किंवा 0-4 असा पराभव झाल्यास अंतिम सामन्यात खेळण्याच्या संघाच्या आशा धुळीस मिळतील. इंग्लंडला टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी 3 -0 ने विजय मिळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियासाठी गोष्टी खूपच सोप्या आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभव टाळणे गरजेचे आहे आणि अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी किमान दोन खेळ जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडकडे WTC पूर्वी कुठलीही मालिका शेड्यूल नाही आणि त्यांचे भवितव्य मुख्यत्वे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर अवलंबून आहे.

दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि बांग्लादेश संघ उर्वरित सर्व सामने जिंकले तरी अंतिम फेरीत प्रवेश करू शकत नाहीत.