ICC Women's World Cup 2022: दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध ‘हे’ पाच खेळाडू बजावतील मुख्य भूमिका, टीम इंडियाचे सेमीफायनल तिकीट पक्के करतील
स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

IND-W vs SA-W, World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकच्या (ICC Women's World Cup) साखळी सामन्यातील आता दोनच सामने शिल्लक आहेत. 27 मार्च, रविवारी पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि बांगलादेश आमनेसामने येतील. तर दुसऱ्या सामन्यात भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका महिला (South Africa Women) संघ एकमेकांशी भिडतील. ऑस्ट्रेलिया सर्व लीग सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, तर न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे आफ्रिकी संघाला देखील उपांत्य फेरीतचे तिकीट मिळाले. आता उर्वरित दोन जागांसाठी वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारत यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये असून त्यांना टॉप-4 मध्ये पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव करणे गरजेचे आहे. हा सामना क्रीस्टचर्च (Christchurch) येथे खेळला जाणार आहे आणि टीम इंडिया (Team India) विजय मिळवून देण्यात खालील खेळाडू महत्वाची भूमिका बजावतील. (ICC Women World Cup Points Table: ऑस्ट्रेलिया महिलांचा सलग सातवा विजय, टीम इंडियाचे सेमीफायनलचे भवितव्य आता खेळाडूंच्या हाती अवलंबून)

1. स्मृती मंधाना (Smriti Mandhana)

भारताची स्टायलिश फलंदाज स्मृती सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत चांगल्या लयीत असून संघासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू आहे. स्मृतीने या विश्वचषकात एक शतक ठोकून पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध ‘आर या पार’च्या लढाईत स्मृतीकडून मोठी खेळी टीम इंडियाला अपेक्षित असेल. मंधानाने संघाला संघाला प्रभावी सुरुवात करून दिल्यास मधल्या फळीवर दडपण येणार नाही.

2. शेफाली वर्मा (Shafali Verma)

युवा स्टार सलामी फलंदाजाला यावेळी विश्वचषकात अधिक संधी मिळाली नाही, पण ती संघाच्या मुख्य खेळाडूंपैकी आहे. आतापर्यंत तीन विश्वचषक सामने खेळलेल्या शेफालीवर अनुभवी स्मृतीच्या साथीने संघाला मोठी सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. यापूर्वी बांगलादेश महिलांविरुद्ध शेफालीने 42 धावा केल्या होत्या.

3. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)

न्यूझीलंड दौऱ्यावर अपयशी ठरलेली हरमनप्रीत कौर संघाची मुख्य अष्टपैलू आणि तिच्यावर मधल्या फळीची मोठी जबाबदारी असेल. बांगलादेशविरुद्ध धावा करण्यात हरमनप्रीतने निराश केले, त्यामुळे आता संघासाठी निर्णायक सामन्यात तिने मोठे योगदान देणे गरजेचे आहे. हरमनप्रीत 270 धावांसह या विश्वचषकात सर्वाधिक रन्स करणारी टॉप-5 फलंदाजपैकी आहे.

4. स्नेह राणा (Sneh Rana)

आपला पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या स्नेह राणाने बॅट आणि बॉलने प्रभावी योगदान दिले आहे. स्नेह या विश्वचषकात 10 विकेट घेऊन भारतीय संघाची आघाडीची गोलंदाज आहे. बॅटने निर्णायक खेळी करून राणाने 6 सामन्यात 100 धावांचे संघात योगदान दिले आहे. अशा परिस्थितीत आता दक्षिण आफ्रिकी फलंदाजांवर वेसण घालण्याची जबाबदारी या युवा फिरकीपटूवर असेल.

5. पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar)

स्नेह प्रमाणेच पूजा वस्त्रकर हिने देखील बॅट आणि बॉलने मोठे योगदान दिले आहे. पूजाने देखील सहा सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. आणि दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी सध्या विकेट घेण्यासाठी संघर्ष करत असल्यामुळे पूजावर वेगवान गोलंदाजीने आफ्रिकी खेळाडूंच्या धावगतीवर वेसण घालण्याची जबाबदारी असेल.