ENG W vs WI W (Photo Credit - X)

ICC Womens T20 World Cup 2024: कर्णधार हेली मॅथ्यूजच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिजने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले. वेस्ट इंडिजच्या या विजयासह इंग्लंडचे टी-20 विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न भंगले, तर यासह उपांत्य फेरी गाठणारे चार संघ निश्चित झाले. (हे देखील वाचा: ENG W vs WI W, 2024 ICC Women's T20 World Cup Scorecard: वेस्ट इंडिजकडून मोठा उलटफेर, इंग्लंडचा 6 विकेट्सनी पराभव करून स्पर्धेतून केले बाहेर, हीली मॅथ्यूज, कियाना जोसेफ यांचा शानदार खेळ)

गोलंदाजीत दोन विकेट घेतल्यानंतर मॅथ्यूजने 50 धावांची खेळी खेळली. तिने पहिल्या विकेटसाठी प्लेअर ऑफ द मॅच कियाना जोसेफ (52 धावा) सोबत 74 चेंडूत 102 धावांची भागीदारी केली. इंग्लंडला सहा गड्यांच्या मोबदल्यात 141 धावांवर रोखल्यानंतर वेस्ट इंडिजने 18 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. गेल्या 14 सामन्यांमधला वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर पहिला विजय आहे.

या विजयासह 2016 च्या चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाने गटात पहिल्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेनेही अंतिम चारमध्ये आपले स्थान पक्के केले, तर गटात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड संघाचा प्रवास संपला.

उपांत्य फेरीत या संघांमध्ये होणार लढत 

पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने येतील, हा सामना 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर वेस्ट इंडिजचे आव्हान असेल, हा सामना 18 ऑक्टोबरला होणार आहे.