ICC U19 World Cup 2022: वेस्ट इंडिज येथे सुरु असलेला आयसीसी अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांनी सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. अफगाणिस्तानचा (Afghanistan) संघ स्पर्धेसाठी उशिरा पोहोचला, त्यामुळे आयसीसीला त्यांच्या गट टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक बदलावे लागले, परंतु संघाने उपांत्य फेरी गाठून वेळापत्रक बदलण्याचा निर्णय योग्य सिद्ध केला. आणि आता इतिहास रचण्याच्या इराद्याने संघ मंगळवारी इंग्लंडविरुद्ध (England) उतरणार आहे. अफगाणिस्तान संघाने आपल्या देशात युद्धासह अनेक समस्यांना तोंड दिले आहे. आयसीसीने (ICC) अफगाणिस्तान संघाच्या स्पर्धेतील चार सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून आता संघ अंडर-19 स्तरावरील सर्वोच्च स्पर्धेत सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडला पराभूत करून इतिहास रचण्यासाठी उत्सुक असेल.
अफगाणिस्तानचा संघ कधीही अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही आणि उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केल्यास तो इतिहास रचेल. व्हिसा संबंधित समस्यांमुळे संघ वेळेत स्पर्धेसाठी पोहोचू शकला नाही. याशिवाय संघाचा अंतिम चारमधील प्रवासही नाट्यमय राहिला. उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ फक्त 134 धावाच करू शकला. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर मात्र संघाच्या गोलंदाजांनी करिष्मा करून श्रीलंकेला 46 षटकांत 130 धावांत गुंडाळले. अशाप्रकारे अफगाणिस्तान संघाने दुसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या सुपर लीग सेमीफायनल फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2018 मध्ये न्यूझीलंडमध्येही संघ अंतिम चारमध्ये पोहोचला होता. दुसरीकडे, आता उपांत्य फेयरत इंग्लंड संघ अफगाणिस्तानसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान असेल यात शंका नाही. इंग्लंड संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी कौशल्यासाठी ओळखला जातो.
जेकब बेथेल अफगाणिस्तान गोलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतो. याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या विजयात या अष्टपैलू खेळाडूने आपली छाप पाडली आणि 42 चेंडूत 209.52 च्या स्ट्राईक रेटने 88 धावा केल्या. बेथेलने आतापर्यंत स्पर्धेच्या चार सामन्यात दोन अर्धशतकांसह 201 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 50.25 तर स्ट्राइक रेट 112.92 आहे. अशा परिस्थितीत इंग्लंड संघाला त्याच्याकडून अफगाणिस्तानविरुद्ध आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तथापि, संघाकडे इतर अनेक सक्षम खेळाडू आहेत ज्यांच्याकडे स्वबळावर सामने जिंकू शकतात. अशा परिस्थितीत आजच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात अफगाणिस्तान इतिहास रुचणार की इंग्लंड बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.