ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2020 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारताच्या गटात कोणत्या देशांचा आहे समावेश
आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंडर-19 ट्रॉफी (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका (South Africa) मध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 2018 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा (Indian Team) अ गटात श्रीलंका, न्यूझीलंड आणि जपान संघासोबत समावेश करण्यात आला आहे. टूर्नामेंटची सुरुवात 17 जानेवारीपासून सुरु होईल. भारताचा पहिला सामना श्रीलंकाविरुद्ध 19 जानेवारीला ब्लोएमफोंटेन मधील माणगॉंग ओव्हलमध्ये खेळला जाईल. तर, यजमान दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तानविरुद्ध 17 जानेवारी रोजी किम्बरले येथील डायमंड ओव्हलमध्ये खेळणार आहे. अंडर-19 विश्वचषकात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. भारतीय संघाने 4 वेळा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने तीनदा, पाकिस्तानने दोनदा, तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवले आहे.

न्यूझीलंडमधील शेवटच्या आवृत्तीतील अव्वल 11 पूर्ण सदस्य आणि या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले पाच प्रादेशिक चॅम्पियनही 12 ते 15 जानेवारी दरम्यान जोहान्सबर्ग आणि प्रेटोरिया येथे सराव सामने खेळतील.  दरम्यान, पोटचेफस्टरूममधील जेबी मार्क्स ओव्हल मैदान महत्वाची भूमिका बजावेल. या मैदानावर दोन सुपर लीग उपांत्यपूर्व, दोन्ही सेमीफायनल आणि फायनल सामने खेळले जातील. चार गटांतील प्रत्येकी दोन संघ सुपर लीगमध्ये प्रवेश करतात तर उर्वरित संघ प्लेट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतील.

असे आहे आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकसाठीचे गट

गट अ: भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान

गट ब: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया

गट सी: पाकिस्तान, बांग्लादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड

गट डी: अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (युएई)

यंदाच्या जपानसह नायजेरिया पहिल्यांदास्पर्धेत सहभागी घेणार आहे. नायजेरिया आणि जपानसह इतर प्रादेशिक पात्र ठरलेल्या संघात कॅनडा, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.