ICC Test Rankings: विराट कोहली चे अव्वल स्थान अजूनही कायम, दुहेरी शतक झळकावणाऱ्या एंजेलो मॅथ्यूज ला झाला फायदा
विराट कोहली (Photo Credits: Twitter/@BCCI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नवीनतम टेस्ट फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) प्रथम स्थान कायम राखले आहे, तर बुधवारी झिम्बाब्वेविरुद्ध दुहेरी शतक झळकावणाऱ्या श्रीलंकेच्या एंजेलो मॅथ्यूज  (Angelo Mathews) याला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहा जागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सर्वाधिक गुणांसह टीम इंडियाचा कर्णधार कोहली अजूनही कायम आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आहे. कोहलीचे 928 गुण आहेत तर ऑस्ट्रेलियाचा स्मिथ त्याच्या 17 गुण मागे आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळलेला मार्नस लाबूशेन तिसर्‍या क्रमांकावर आहे. बुधवारी झिम्बाब्वेविरुद्ध दुहेरी शतक ठोकणारा मॅथ्यूज 16 व्या स्थानी आला आहे. चेतेश्वर पुजारा 791 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अजिंक्य रहाणे चे 759 गुण आहेत.

मॅथ्यूजने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद 200 धावा केल्या. त्याने 468 चेंडूत 168 आणि 3 षटकारांच्या मदतीने हे दुहेरी शतक झळकावले. 2004 मध्ये कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट तिसरा रँकिंग मिळविणारा मॅथ्यूज 16 व्या स्थानी पोहोचला. या मालिकेची अजून एक कसोटी मालिका शिल्लक आहे, त्यामुळे त्याच्याकडे क्रमवारीत सुधारणा करण्याची चांगली संधी आहे. दुसरीकडे, या यादीत पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह 794 गुणांसह सहाव्या, तर आर अश्विन आठव्या आणि मोहम्मद शमी दहाव्या स्थानावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा 438 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. इंग्लंडचा ओली पोप 52 स्थानांची झेप घेऊन 52 व्या स्थानी पोहोचला, तर सॅम कुरन आणि डोम सिब्ली अनुक्रमे 64 व्या आणि 76 व्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलू यादीत बेन स्टोक्स दुसर्‍या क्रमांकावर आहे.