स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: AP/PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, म्हणजेच आयसीसी (ICC) ने मंगळवार, 6ऑगस्ट रोजी नवीन टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील विद्यमान फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 16 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर राहिलेल्या स्मिथने इंग्लंड (England) विरुद्ध पहिल्या अ‍ॅशेस (Ashes) सामन्याच्या दोन्ही डावात तुफानी शतक झळकावले. याचबरोबर स्मिथने आपण टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे दर्शवित आहे. वर्षभर क्रिकेटमधून बंदी घालण्यापूर्वी स्मिथ आयसीसी टेस्ट क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होता. इतकाच नाही तर त्याच्यावर बंदीनंतर देखील कित्येक महिने स्मिथ फलंदाज म्हणून आयसीसी टेस्ट क्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहिला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याला मागे ढकलत आपले राज्य स्थापन केले जे आता धोक्यात असल्याचे दिसत आहे. (Ashes 2019: दुसऱ्या टेस्टआधी इंग्लंडला मोठा धक्का; जेम्स अँडरसन याची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार)

इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 144 आणि दुसऱ्या डावात 142 धावा करत स्मिथ आयसीसी क्रमवारीच्या चौथ्या ते तिसर्‍या स्थानावर आला आहे, तर भारतीय खेळाडू चेतेश्वर पुजारा याची तिसर्‍या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. स्मिथने टेस्ट क्रमवारीत पुन्हा एकदा 900 गुणांची कमाई केली आहे. स्मिथचे रेटिंग पॉईंट्स आधी 857 होते जे आता 903 झाले आहेत. स्मिथने एकाच सामन्यात 46 रेटिंग गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटचा राजा होईल, असं वाटणं साहजिक आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या आयसीसी टेस्ट क्रमवारीत 922 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 913 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. कोहली आणि स्मिथ यांच्यात केवळ 19 गुणांचा फरक आहे. गोलंदाजीमध्ये नॅथन लायन (Nathan Lyon) आणि जलद गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) यांना देखील फायदा झाला आहे. लायनने पहिल्या अ‍ॅशेस टेस्टच्या दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.

14-18 ऑगस्ट दरम्यान लॉर्ड्स (Lords) येथे खेळवण्यात येणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेच्या दुसर्‍या टेस्ट सामन्यात स्मिथ आणखी एक मोठी खेळी करण्यास यशस्वी झाला तर तो कोहलीला टेस्ट क्रमवारीत मागे टकलू शकतो. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टेस्ट सामना 22 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.