ICC Test Rankings: ओव्हल कसोटीपूर्वी रोहित शर्माचा कर्णधार विराट कोहलीला धक्का, Joe Root नंबर 1 स्थानावर विराजमान
विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC Test Rankings: भारताविरुद्ध (India) सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील काही जबरदस्त प्रदर्शनांच्या जोरावर इंग्लंड (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) फलंदाजीच्या आयसीसी पुरुष कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर 1 स्थान काबीज केले आहे. इंग्लिश कर्णधाराने नॉटिंगहम, लॉर्ड्स आणि लीड्स अशा तीनही कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावली आणि 126.75 च्या सरासरीने सर्वाधिक 507 धावा केल्या आहेत. यासह न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनला ओव्हरटेक करत रूट सहा वर्षानंतर पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. रूटने चार्टमध्ये पाचव्या क्रमांकाची मालिका सुरू केली, परंतु त्याच्या जबरदस्त फॉर्मने त्याला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर नेले. हेडिंग्ले कसोटीत रूटच्या तिसऱ्या शतकामुळे इंग्लंडला लॉर्ड्सच्या पराभवातून पुनरागमन करण्यात मदत झाली आणि इंग्लिश संघाने पाहुण्या टीम इंडियाला (Team India) एक डाव आणि 76 धावांनी पराभूत केले. यासह त्यांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी देखील केली. (IND vs ENG 4th Test: इंग्लंडच्या मालिका विजयात ‘हा’ भारतीय ठरणार हुकमी एक्का; चौथ्या कसोटीपूर्वी Joe Root ने केला दावा, गोलंदाजांनी काढला तोडगा)

इंग्लंडच्या फलंदाजी विभागात लीड्समधील मालिका-बरोबरीच्या विजयानंतर जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनाही फायदा झाला आहे. दुसरीकडे, भारताकडून रोहित शर्माला (Rohit Sharma) सर्वात जास्त फायदा झाला आहे. रोहितने कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आणि पहिल्या पाच फलंदाजांच्या क्रमवारीत झेप घेतली. रोहितचे 773 रेटिंग गुण आहेत, जे कर्णधार कोहलीपेक्षा 7 अधिक आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्य राखण्यासाठी संघर्ष करत आहे. रोहितने इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांमध्ये 230 धावा केल्या आहेत तर कोहलीने समान सामन्यांमध्ये फक्त 124 धावा केल्या आहेत. तसेच चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात 91 धावांच्या झुंजार खेळीने त्याला तीन स्थानांची प्रगती करून दिली आणि त्याने 15 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

याशिवाय, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी तिसऱ्या कसोटीतील कामगिरीनंतर गोलंदाजी क्रमवारीत लक्षणीय प्रगती केली आहे. अनुभवी जेम्स अँडरसनने अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे, तर ऑली रॉबिन्सन आणि क्रेग ओव्हरटन यांनी देखील क्रमवारीत काही पावले पुढे टाकली आहेत. रॉबिन्सन नऊ स्थानांनी पुढे जात 36 वे स्थान गाठले तर ओव्हरटनने 73 व्या स्थानावर झेप घेतली. दरम्यान, ओव्हलमध्ये चौथी कसोटी सुरु होणार झाल्याने, दोन्ही संघाच्या खेळाडूंना पुढील आठवड्यात रँकिंग चार्टमध्ये लक्षणीय फायदा करून घेण्याची आणखी एक संधी मिळेल.