T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर विराट कोहलीच्या वक्तव्याने जडेजा नाराज, दिली ‘अशी’ मोठी प्रतिक्रिया
विराट कोहली (Photo Credit: PTI)

ICC T20 World Cup 2021: भारताचा माजी फलंदाज अजय जडेजा (Ajay Jadeja) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पराभवानंतर भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) केलेल्या वक्तव्यावर नाराज दिसत आहे. जडेजा म्हणाला की कर्णधार विराट कोहली म्हणाला की भारतीय संघ त्यांचे सलामीवीर लवकर बाद झाल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध बॅकफूटवर ढकलला गेला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) सामन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या षटकात रोहित शर्मा व केएल राहुलला बाद केले. मात्र विराट कोहली क्रीजवर तग धरून खेळ राहिला आणि सामन्यानंतर म्हणाला की आफ्रिदीच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजांवर दबाव आणला. कर्णधार विराट कोहलीच्या या विधानाने अजय जडेजा निराश झाला असून विराट कोहलीसारखा खेळाडू मैदानात असताना टीम इंडिया (Team India) दडपणाखाली कशी येऊ शकते, असे मत त्याने व्यक्त केले. (T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून भारताने ‘हे’ धडे घेतले पाहिजेत, माजी दिग्गज फलंदाजाचा ‘विराट ब्रिगेड’ला सल्ला)

कोहलीने 49 चेंडूत 57 धावा केल्या पण त्याला फारशी साथ न मिळाल्याने पाकिस्तानने भारताला 151/7 धावांपर्यंत रोखले. “मी त्या दिवशी विराट कोहलीचे विधान ऐकले. तो म्हणाला जेव्हा आम्ही दोन विकेट गमावल्या तेव्हा आम्ही पाकिस्तानविरुद्ध सामन्यात मागे पडलो. त्यामुळे मी निराश झालो,” जडेजा क्रिकबझवर म्हणाला. “जेव्हा विराट कोहलीसारखा खेळाडू खेळपट्टीवर असतो, तेव्हा सामना संपण्याचा कोणताही मार्ग नाही. त्याने दोन चेंडूही खेळले नव्हते आणि तो तसाच विचार करत होता. त्यामुळे भारताचा दृष्टिकोन दिसून येतो,” तो पुढे म्हणाला. भारताने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आजम यांनी एकही विकेट न गमावता 152 धावांचे लक्ष्य गाठले. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाने विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला.

भारताचा धुव्वा उडवल्यावर पाकिस्तानने न्यूझीलंडला पाच गडी राखून हरवून ग्रुप 2 मध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले. स्पर्धेतील त्यांचे भवितव्य निश्चित करण्यात भारताचा आता रविवारी न्यूझीलंडशी सामना होणार आहे. आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या या दोन्ही संघांना आता उर्वरित सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. टी-20 विश्वचषकच्या या सामन्यात ज्या संघाच्या पदरी पराभव येईल त्याची सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल आणखी कठीण होईल. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असेल.