विराट कोहली आणि केएल राहुल (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) मधील टी-20 मालिका संपुष्टात आली असून आणि आयसीसीने टी-20 रँकिंग (ICC T20I Ranking) जाहीर केली आहे. नवीन जाहीर केलेल्या यादीत पहिल्या 10 खेळाडूंच्या क्रमवारीत मोठा बदल झालेला दिसत आहे. टीम इंडियाचा नवीन सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याच्या क्रमवारीत काही बदल झाला नसून त्याचे दुसरे स्थान कायम आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची घसरण झाली आहे. कोहली एक स्थानी घसरून दहाव्या स्थानावर आला. सोमवारी जाहीर झालेल्या रँकिंगमधील कामगिरीचा फायदा इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनला (Eoin Morgan) झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत सामनावीर ठरलेल्या मॉर्गनने विराटच्या जागेवर कब्जा केला असून नवव्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, आफ्रिकी कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यालाही फायदा झाला आहे. त्याने 10 स्थानाची झेप घेतली आणि 16 व्या स्थानी पोहचला आहे.

मॉर्गनने तीन डावांमध्ये 170 च्या स्ट्राईक-रेटने 136 धावा केल्या आणि मालिकेमध्ये दोन अर्धशतकांची नोंद नोंदवणारा एकमेव फलंदाज होता. त्याने एमआरएफ टायर्स आयसीसी टी-20 च्या फलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या स्थानी पोहचण्यासाठी कोहली आणि त्याचा उपकर्णधार रोहित शर्मा यांना मागे टाकले. रोहित पहिल्या दहा फलंदाजांमधून बाहेर पडला आणि 11 व्या स्थानी पोहचला आहे. रोहितला न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी-20 सामन्यात दुखापत झाली होती.

गोलंदाजांच्या बाबतीत, तबरेझ शम्सी ने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले. शम्सीने नऊ स्थानांची झेप घेत आठव्या स्थानावर कब्जा केला, तर आदिल रशीद आणि आदिले फेहलुकवायोचे सहावे स्थान मिळवले. सध्या बाबर आजमने फलंदाजांची अव्वल स्थान कायम ठेवले असून त्याच्या मागे राहुल आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच, तर गोलंदाजी आणि अष्टपैलू रँकिंगमध्ये अनुक्रमे अफगाणिस्तानचे रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी वर्चस्व कायम ठेवले आहेत.