ICC Cricket World Cup 2019: टीम इंडिया सोबत लढण्यापूर्वीच दक्षिण अफ्रिका संघाला मोठा झटका; Dale Steyn वर्ल्ड कप 2019 मधून बाहेर
Beuran Hendricks and Dale Steyn (Photo Credits: Getty)

ICC Cricket World Cup 2019: वर्ल्ड कप 2019 क्रिकेट स्पर्धेचे पहिले दोन सामने पराभूत झालेल्या दक्षिण अफ्रिका संघाचा सामना उद्या म्हणजेच 5 जून 2019 रोजी भारतीय क्रिकेट टीम सोबत होत आहे. दरम्यान, हा सामना होण्यापूर्वीच दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाला मोठा झटका बसला आहे. दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा मातब्बर खेळाडू डेल स्टेन (Dale Steyn) हा वर्ल्ड कप 2019 मधून बाहेर गेला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे डेल स्टेन मैदानात उतरु शकणार नाही. याच कारणामुळे क्रिकेट विश्वचषक 2019 मधून डेल स्टेन याला माघार घ्यावी लागत आहे.

दक्षिण अफ्रिका संघात आता डेल स्टेन याची जागा ब्यूरन हेंड्रिक्स (Beuran Hendricks) घेणार असल्याचे नक्की करण्यात आले आहे. ब्यूरन हेंड्रिक्स हा भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका या 5 जून 2019 रोजी होणाऱ्या सामन्यात सहभागी होईल. हा सामना साउथैंप्टन येथे होणार आहे. वर्ल्ड कप 2019 मधील हा 8 वा सामना आहे. हेंड्रिक्स याने याच वर्षी (2019) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. (हेही वाचा, ICC Cricket World Cup 2019: उद्या होणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह याची डोप टेस्ट)

डेल स्टेन याच्या जाण्याने दक्षिण अफ्रिकेला धक्का बसला आहे कारण, तो संघातील सर्वात अनुभवी आणि जबाबदार खेळाडूंपैकी एक होता. आयपीएल 2019 दरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. सर्व उपचार आणि आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही तो तंदुरुस्त होऊ शकला नाही. डेल स्टेन रॉयल चैलेंजर्स बैंगलोर साठी दोन सामने खेळून आयपीएलमधून बाहेर गेला होता. तेव्हापासून तो अनफिटच आहे.

दक्षिण अफ्रिकेसमोरील समस्या अशी की, डेल स्टेन हा बाहेर गेल्यानंतर संघातील दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज लुंगी नगिदी हा सुद्धा हेमस्ट्रिंग दुखापतीने ग्रस्त आहे. याशिवाय सलामी फलंदाज हाशिम अमला हासुद्धा दुखापत ग्रस्त आहे. डेल स्टेन याच्या खांद्यावर 2016 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर फारसा नजरेस पडला नव्हता. सध्या वयाच्या पस्तिशीमध्ये असलेल्या या खेळाडूला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावे लागणे हे त्याच्या करिअरच्या दृष्टीने घातक मानले जात आहे.