ICC WTC Final सामन्यापूर्वी किवी संघासाठी धोक्याची घंटा; Kane Williamson जखमी, हा स्टार खेळाडू इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यातून आऊट
न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना 10 जूनपासून एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाची डोकेदुखी वाढली आहे. स्टार स्पिनर मिचेल सॅटनर (Mitchell Santner) दुखापतीमुळे दुसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे, तर कर्णधार केन विल्यमसनही (Kane Williamson) दुखापतग्रस्त आहे. कर्णधार विल्यमसनच्या डाव्या कोपऱ्याच्या दुखापतीवर नजर ठेवण्यात येत असून बुधवारी त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड (Gary Stead) यांनी मंगळवारी सांगितले. लॉर्ड्स (Lord's) क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने सामन्यात बहुतेक भागात वर्चस्व गाजवले असतानाही सामना अनिर्णित राहिला. विल्यमसनला यंदा वर्षाच्या सुरुवातीला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच त्याने सनरायझर्स हैदराबादकडून इंडियन प्रीमियर लीगमधील तब्बल 3 सामने गमावले होते. (ICC WTC Final 2021: भारत-न्यूझीलंड फायनल मुकाबल्यात 2008 अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतील या 5 स्टार खेळाडूंमध्ये होणार टक्कर)

आयपीएलच्या फ्रँचायझी बायो-बबलमध्ये कोविड-19 प्रकरणे आढळल्यावर स्पर्धेचे उर्वरित 31 सामने स्थगित करण्यात आले होते ज्यामुळे विल्यमसनला यूके दौऱ्यापूर्वी आवश्यक ब्रेक मिळण्यास मदत झाली. ब्लॅककॅप्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले की, “गॅरी स्टेड म्हणाले की बर्मिंघमच्या लॉर्ड्स येथे खेळलेले सर्व वेगवान गोलंदाज खेळणार नाहीत. ट्रेंट बोल्ट परतला असून दुसर्‍या कसोटीत खेळू शकतो. मिचेल सॅटनर बोटाच्या दुखापतीने दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे, विल्यमसनच्या डाव्या कोपऱ्याच्या दुखापतीवर नजर ठेवण्यात येत आहे, त्याच्याबद्दल आज निर्णय घेण्यात येईल.” न्यूझीलंड क्रिकेट टीम 18 जूनपासून भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना खेळणार असल्याने सध्या संघ विल्यमसनच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्कारू इच्छित नसतील. त्यामुळे, विल्यमसन जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापूर्वी विश्रांती दिली जाऊ शकते.

दुसरीकडे, सॅटनर सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अशास्थितीत सॅटनरच्या जागी अजाज पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. पहिल्या कसोटीत टिम साउदी, नील वॅग्नर, काईल जेमीसन आणि कॉलिन डी ग्रॅन्डहोम हे वेगवान गोलंदाज खेळले होते. त्यापैकी एक ट्रेंट बोल्टसाठी स्थान निर्माण करेल.