टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने सध्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. व्यस्त वेळापत्रकातून काही वेळ काढत विराट आपला 31 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासह भूतानला (Bhutan) पोहचला आहे. येथील दोंघांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्कानेही एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने तिच्या ट्रेकिंगच्या अनुभवाविषयी सांगितले आहे. हा अनुभव त्याच्यासाठी संस्मरणीय कसा ठरला हे तिने लिहिले आहे. 5 नोव्हेंबरला विराटचा वाढदिवस आहे आणि यामुळे दोन्ही स्टार भूतानमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. (Virat Kohli Birthday Special: अनुष्का शर्मा हिला पहिल्यांदा पाहून नर्वस झाला होता विराट कोहली, जाणून घ्या विरुष्काच्या नात्यामधील काही खास गोष्टी)
अनुष्काने लिहिले की, "आज साडेआठ किलोमीटर चढाई केल्यानंतर आम्ही एका छोट्या गावात पोहोचलो. तिथे आम्ही एका ठिकाणी राहिलो आणि 4 महिन्यांच्या छोट्या गाईच्या वासराला चारा खायला दिला. घराच्या मालकाला असे वाटले की आम्ही थकलो आहोत आणि आम्हाला चहासाठी विचारले. आम्ही त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या कुटुंबीयांना आम्ही कोण आहोत याची काही कल्पना नसतानाही आमचे स्वागत केले. आम्ही त्यांच्याशी बोललो, चहा प्यालो आणि त्यांना फक्त असे वाटले की आम्ही दोन लोक ट्रेकिंगमुळे थकलो आहोत." अनुष्काने सोशल मीडियावर ट्रेकिंगचा अनुभव शेअर करताना काही फोटोज देखील शेअर केले. यातील पहिल्या फोटोमध्ये अनुष्का-विराट भूतानमधील त्या कुटुंबासोबत दिसत आहे, तर अन्य फोटोंमध्ये ते ट्रेक करताहेत.
अनुष्काने पुढे लिहिले की, "जे कोणी मला किंवा विराटला जवळून जाणतात त्यांना हे माहित असेल की मला आणि विराटला इतके सोपे आणि मानवी संबंध खूप आवडतात. आम्हाला हे जाणून फार आनंद वाटला की ते लोकं दोन अज्ञात व्यक्तींसोबत किती प्रेमळपणे वागले आणि ते आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करीत नव्हते. जर हा जीवनाचा वास्तविक अर्थ नसेल तर ते काय आहेत हे मला ठाऊक नाही. ही एक स्मृती आहे जी म्हज्या अंतःकरणाजवळ नेहमीच राहील." यापूर्वी, एका लांब पोस्टद्वारे अनुष्काने तिच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. या पोस्टद्वारे अनुष्काने पूर्व विकेटकीपर फारुख इंजिनिअर यांना त्यांच्या दाव्यासाठी प्रत्युत्तर दिले होते. फारुख यांनी दावा केला होता की विश्वचषक सामन्यादरम्यान निवड समितीने अनुष्काला चहा दिला होता.