वर्ष 2019 संपणार आहे, यासह हे दशकही संपुष्टात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि विस्डेन यांनी या दशकाची कसोटी आणि वनडे संघांची निवड केली आहे. काही माजी खेळाडू त्यांच्या गणितानुसार वर्ल्ड इलेव्हनचीही निवड करत आहेत. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही 2019 चा वर्ल्ड इलेव्हन निवडला आहे. गंभीरच्या वर्ल्ड प्लेइंग इलेव्हनची गंमतशीर बाब म्हणजे त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची कर्णधार म्हणून निवड केलेली नाही, आणि महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला संघात स्थानही नाही दिले. दशकातील वनडे संघात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धोनीची कर्णधार म्हणून निवड केली आहे, तर कसोटी संघात कोहलीला कर्णधारपद दिले होते. विस्डेननेही दशकांच्या कसोटी संघाची घोषणा केली. या संघात केवळ दोन भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यातील एक नाव कोहली आणि दुसरे रविचंद्रन अश्विन याचे होते. (क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महेंद्र सिंह धोनी याला दिला मोठा सन्मान; बनवले ODI Team Of Decade चा कर्णधार, रोहित शर्मा-विराट कोहली ही अंतिम 11 मध्ये)
आणि आता गंभीरने आश्चर्यकारक वर्ल्ड इलेव्हन जाहीर केले. त्याने आपला प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार केन विल्यमसन याला बनवले आहे. यासह त्याच्या संघात वायु राघवन (Vayu Raghvan) आणि अरविंद वशिष्ठ (Arvind Vashishth) या काल्पनिक पात्रांचा समावेश केला आहे. राघवनचे पात्र विराटसारखे आहे. राघवनची भूमिका अभिनेता तनुज विरवानी याने निभावली आहे. 2011 च्या विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात मुख्य भूमिका बजावलेल्या गंभीरने भारताचा विद्यमान सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा टॉम लाथम याला सलामीवीर फलंदाज म्हणून निवडले. तिसर्या आणि चार स्थानांकरिता त्याने सध्या जगातील सर्वोत्कृष्ट चारपैकी अनुक्रमे स्टीव्ह स्मिथ आणि भारतीय कर्णधार विराट कोहली याची निवड केली.
As #2019 comes to an end, we have witnessed some great cricketing talent. Here's my pick for World XI.
Rohit Sharma
Tom Latham
S. Smith
Virat Kohli
K.Williamson (c)
Arvind Vashishth
Ben Stokes
Cummins
Bumrah
N. Lyon
Vayu Raghavan#YearRoundUp #Wrapped2019 #PPL19 #InsideEdge2
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 24, 2019
गौतम गंभीरची 2019 वर्ल्ड प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे:
रोहित शर्मा, टॉम लाथम, स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली, केन विल्यमसन (कॅप्टन), अरविंद वशिष्ठ, बेन स्टोक्स, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह, नाथन लायन, आणि वायू राघवन.