खुशखबर! International Cricket मध्ये होणार चाहत्यांची वापसी; स्टेडीयममध्ये बसून सामना पाहण्यासाठी 18,000 प्रेक्षकांना परवानगी
क्रिकेट स्टेडीयम, संग्रहित प्रतिमा (Photo: cricketmaharashtra.com)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे जगभरात अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे स्टेडीयममध्ये बसून चाहत्यांना सामने पाहण्यास मज्जाव होता. मात्र आता अनेक देशांमध्ये हा व्हायरस आटोक्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण चालू आहेत. अशात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमवर येऊ शकतील. इंग्लंड आणि न्यूझीलंड (England and New Zealand) यांच्यात 10 जूनपासून एजबॅस्टन (Edgbaston) येथे होणाऱ्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी 18 हजार चाहत्यांना परवानगी देण्यात आली आहे. 18 हजार चाहत्यांची क्षमता ही मैदान क्षमतेच्या 70 टक्के आहे.

सरकार व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (RCB) यांच्यात यावर सहमती झाली आहे. मैदानात प्रवेश करताना चाहत्यांना 24 तास आधीचा नकारात्मक चाचणीचा अहवाल दाखवावा लागेल. मैदानावर येणार्‍या सर्व लोकांचे वय 16 वर्षांपेक्षा जास्त असावे. 2 जूनपासून लॉर्ड्स येथे होणारी पहिली कसोटी या प्रकल्पाचा भाग असणार नाही. चाहत्यांना कोरोना दरम्यान काऊन्टी क्रिकेटमध्येही प्रवेश देण्यात आला आहे.

एजबॅस्टन स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट केन म्हणाले की, हे एक मोठे स्टेडियम आहे. आमच्याकडे अनुभवी ऑपरेशनल टीम आहे, ज्यांना हे काम चांगल्या पद्धतीने कसे करावे हे माहित आहे. गेल्या उन्हाळ्यात आम्ही असे कार्यक्रम केले होते. म्हणून स्टेडियममध्ये सामना पाहण्यास सक्षम असलेल्या हजारो चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात प्रेक्षकांच्या सहभागामुळे, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रेक्षकांच्या सहभागाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. (हेही वाचा: ICC WTC फायनल सामन्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, व्हिडिओ पाहून किवी संघालाही फुटेल घाम (Watch Video))

साऊथॅम्प्टन येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चार हजार प्रेक्षकांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. लंडनमध्ये 2 जूनपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात 25 टक्के पेक्षक उपस्थित राहण्यास परवानगी मिळाली आहे.