ENG vs NZ 1st Test 2021: एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत घेतो. वर्षेनुवर्षे सरावासह कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करणे हेच खेळाडूचे अंतिम लक्ष्य असते. तसेच काही खेळाडू असेही आहेत ज्यांनी कठोर परिश्रम घेऊन अनेक त्यागसुद्धा केले आहेत. डेव्हन कॉनवे (Devon Conway) हा असाच एक खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्यासाठी आपले घर-दार, मालमत्ता सर्वकाही विकलं. इतकेच नव्हे तर, त्याने आपला देशही सोडला. आपल्या कष्टाच्या जोरावर त्याने ते सध्या केले जे तो दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) करून शकला नाही. कॉनवेने न्यूझीलंड (New Zealand) संघाकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अनेक मोठ्या विक्रमांची भरमार केली. इंग्लंड (England) विरुद्ध लॉर्ड्स (Lords) येथे झालेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने दुहेरी शतक झळकावले. त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला. (ICC WTC Final 2021: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, फायनल सामन्यापूर्वी या किवी फलंदाजाने इंग्लंडमध्ये केला कहर)
घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करूनही कॉनवेला फक्त फ्रेंचायझी क्रिकेटमध्येच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही. त्याने लायन्ससाठी 12 सामने खेळले आणि एक अर्धशतक झळकावले. राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळत नसल्यामुळे आपला दक्षिण आफ्रिका देश सोडून तो 2017 मध्ये न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनला स्थायिक झाला. दक्षिण आफ्रिका सोडण्यापूर्वी कॉनवेने आपली सर्व मालमत्ता, घर-गाडी सरसकट सर्वकाही विकलं कारण त्याला न्यूझीलंडमध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करायची होती. अखेरीस कठोर परिश्रम आणि क्रिकेटविषयी जिद्दीच्या जोरावर त्याने आपले स्वप्न पूर्ण केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कॉनवेला न्यूझीलंडकडून टी-20 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पहिले नाही आणि 2 जून रोजी ब्लॅककॅप्ससाठी कसोटो पदार्पणाच्या सामन्यात विक्रमांची भरमार केली.
कॉनवेने कठोर परिश्रमाने मिळालेल्या संधीचं सोनं करत लॉर्ड्स कसोटी सामन्यात तुफानी 200 धावा ठोकल्या. दरम्यान, वेलिंग्टन संघाकडून त्याने 17 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यामध्ये 72.63 च्या सरासरीने 1598 धावा केल्या आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कॅंटर्बरी संघाविरुद्ध खेळताना नाबाद 323 धावांची त्रिशतकी खेळीही त्याने केली. यापूर्वी मार्च 2017 मध्ये, 26-वर्षीय कॉनवेने जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर घरगुती क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठोकले. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील त्याचा हा शेवटचा घरगुती सामना होता.