
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी (Ellyse Perry) हिने यंदा महिला अॅशेस (Ashes) टी-20 दरम्यान कोणत्याही अन्य (पुरुष किंवा महिला) क्रिकेटपटू यांना नाही जमाल असा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंड विरुद्ध 47 धावा करत एलिस आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणारी पहिली (महिला/पुरुष) खेळाडू ठरली आहे. इंग्लंडविरुद्ध एलीसने 40 चेंडूत 47 धावा केल्या आणि 2 ओव्हरमध्ये 17 धावा देत 1 गडी बाद केला. नताली सायव्हर (Natalie Sciver) ही पेरीची शंभरावी बळी ठरली.
28 वर्षीय एलिसने आजवर 104 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 1005 धावांसह 103 विकेट्स घेतल्या आहेत. तिने मागील वर्षी नोव्हेंबरमधील वर्ल्ड टी-20 च्या अंतिम सामन्यातच 100 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रविवारी झालेल्या इंग्लंडच्या टी-20 सामन्यात तिने 1000 धावांचा टप्पा ओलांडून या विक्रमाची नोंद केली. दरम्यान, पुरुष आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये माजी पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने 1414 धावांसह 98 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाकिबने 1471 धावा करत 88 विकेट्स टिपल्या आहे.
महिला अॅशेस टी-20 मधील तिच्या प्रभावी खेळीची पेरीला चौथ्यांदा सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.