Ollie Robinson Suspended: न्यूझीलंड विरोधात 7 विकेट घेणाऱ्या ब्रिटिश गोलंदाजाला ECB ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केले निलंबित, सोशल मीडिया बनले कारण
ओली रॉबिन्सन (Photo Credit: Instagram)

Ollie Robinson Suspended: आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 7 विकेट घेणारा ब्रिटिश गोलंदाज ऑली रॉबिनसन (Ollie Robinson) याला कारकीर्दीच्या दुसर्‍या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले असून सोशल मीडिया त्यामागचे कारण बनले आहे. 7-8 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने त्याच्यासाठी आता समस्या निर्माण केली आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England & Wales Cricket Board) शिस्तभंगाच्या चौकशीचे निकाल लागेपर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निलंबित केले आहे. त्यामुळे, एजबॅस्टन (Edgbaston) येथे गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. रॉबिन्सन तातडीने इंग्लंड संघ सोडून आपल्या काऊन्टी क्लब ससेक्समध्ये (Sussex) परत येईल, याची मंडळाने पुष्टी केली आहे. (ENG vs NZ 1st Test: पदार्पणाच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटबद्दल दिलगीरी; म्हणाला 'ते वक्तव्य लज्जास्पद आणि खजील करणारे')

रॉबिन्सनने 2012-13 मध्ये अनेक वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्वीट केले होते, त्याप्रकरणाची चौकशी इंग्लंड क्रिकेट बोर्ड करत असल्याने ही चौकशी पूर्ण होईपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही. रॉबिन्सनने  केलेल्या आपल्या जुन्या ट्विटमध्ये काही शब्दांचा वापर करून विशिष्ट धर्मातील लोकांचा दहशतवादाशी संबंधित असल्याचे म्हटले होते. इतकंच नाही तर महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांवरही अपमानास्पद भाष्य केले गेले होते. त्याचे हे जुने ट्विट्स त्याने लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झाले होते. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. विशेष म्हणजे रॉबिन्सनने लॉर्ड्स कसोटीतील आपल्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्या डावात 4 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स अशा मिळून 7 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान त्याने किवी कर्णधार केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथम अशा दिग्गज खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या होत्या.

दुसरीकडे ट्विट व्हायरल झाल्यावर रॉबिन्सन म्हणाला, “माझ्या कृतीबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि अशा प्रतिक्रिया देण्यास मला लाज वाटते.” त्याने हे विधान आधी अधिकृत प्रसारक आणि नंतर इतर माध्यमांना वाचून दाखवले.. वेगवान गोलंदाज म्हणाला, “त्यावेळी मी अविवेकी आणि बेजबाबदार होतो व त्यावेळी माझी जी मनस्थिती असो माझे ते कार्य क्षम्य होते.” इंग्लिश काऊन्टी यॉर्कशायरने तरुण वयात त्याला बाहेर केल्यामुळे त्याने आयुष्यातील एका वाईट टप्प्यातून जात असताना हे ट्विट केले होते असे रॉबिन्सन म्हणाला.