MS Dhoni, Dinesh Karthik (Photo Credit: Twitter)

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शनिवारी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनीवर सध्या सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. संघातले त्याचे सहकारी, राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रेटी त्याला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत. यातच भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनेही (Dinesh Karthik) धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट करुन पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय क्रिकेट संघासाठी महेंद्रसिंह धोनीचे योगदान मोलाचे आहे. यामुळे धोनीची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करावी, अशी विनंती दिनेश कार्तिकने बीसीसीआयकडे केली आहे.

याआधी बीसीसीआयने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या निवृत्तीनंतर त्यांची 10 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर केली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि 10 नंबरची जर्सी हे समीकरण चांगलेच प्रसिद्ध झाले होती. याचप्रमाणे महेंद्रसिंह धोनीचीही 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. हे देखील वाचा- MS Dhoni Retires: महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, हार्दीक पांड्या यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

दिनेश कार्तिक याचे ट्वीट-

महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 पासून मला निवृत्त समजले जावे", असे त्याने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या पोस्टसोबतच धोनीने एक व्हिडीओही शेअर केला आहे. 39 वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये दिसणार आहे.