दीपक चाहर (Photo Credit: BCCI/Twitter)

चेन्नई सुपर किंग्जचा क्रिकेटपटू दीपक चाहरची (Deepak Chahar) बहीण मालती चाहरने (Malti Chahar) एक मजेदार खुलासा केला. भारतीय वेगवान गोलंदाज दीपकच्या वयात गडबड झाल्यामुळे त्याची बहीण मालतीने थेट सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली. अद्याप वयाची तिशीदेखील न ओलांडलेल्या दीपकचे वय विकिपीडियाने (Wikipedia) चक्क 48 वर्षे लिहिलं आहे. ही बाब लक्षात येत दीपकची मोठी बहीण मालतीने त्याला ट्रोल केलं आणि विकिपीडियाचे आभार मानले. मजेदार अपडेट शेअर करत मालतीने लिहिले की, विकीपीडियामुळेच तिचा भाऊ आता तिच्यापेक्षा मोठा झाला आहे. तिने विकिपीडियाचे आभार मानले आणि म्हटले की विकिपीडियानुसार दीपकचे वय 50 च्या जवळपास असल्याने तो आता सर्वात तंदुरुस्त खेळाडू असेल. मालतीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर दीपकच्या वयाचा स्क्रीनशॉट शेअर केला.

दीपकच्या वयाबाबत विकिपीडियाने केलेल्या गडबडीचा स्क्रीनशॉट शेअर करत मालतीने लिहिले, ‘‘विकिपीडियाचा धन्यवाद… शेवटी तुमच्यामुळे दीपक माझ्यापेक्षा वयाने मोठा झाला आहे. 48 वर्षांचा सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू.’’ शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपकचा पहिला वनडे सामना, टी-20 डेब्यू आणि इतर तपशील लिहिलेले आपल्याला दिसत आहे. परंतु वयाच्या स्तंभात म्हटले की त्याचा जन्म 7 ऑगस्ट 1972 रोजी झाला होता आणि त्याचे वय 48 वर्ष आहे.

विकिपीडियाने तथापि, क्रिकेटरच्या माहितीत सुधार केली असून त्याचे वय 28 दाखवत आहे. विकिपीडिया हे एक मुक्त प्लॅटफॉर्म आहे जिथे इंटरनेट यूजर्स लोक, ठिकाण आणि गोष्टी समर्पित केलेल्या माहितीत बदल करू शकतात. चहरचा जन्म 1992 मध्ये झाला असून तो मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू राहुल चाहरचा चुलत भाऊ आहे. मालती सोशल मीडियावर आणि स्टेडियममधून आपल्या भावांना चीअर करताना दिसते.

दीपक चाहर विकिपीडिया वय (Photo Credit: Wikipedia)

दीपकच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 3 वनडे आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने वनडे सामन्यात दोन आणि टी-20 मध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे जन्मलेल्या दीपकने 45 प्रथम श्रेणी सामन्यात एकूण 126 गडी बाद केलेले आहे.