दानिश कनेरिया, शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानेही (Danish Kaneria) शाहिद आफ्रिदीविरूद्ध (Shahid Afridi) मोर्चा उघडला आहे. गौतम गंभीर, युवराज (Yuvraj Singh) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh), सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या नंतर कनेरियाने आफ्रिदीला खडसावलं आहे. आफ्रिदीने मागील काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच खरडपट्टी करण्यात आली. एकीकडे जग कोरोनाविरुद्ध लढा देत असताना आफ्रिदीने काश्मीर (Kashmir) मुद्द्यावरून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला. या विधानावर भारतीय खेळाडूंनंतर स्वदेशी कनेरियाने आफ्रिदीचा सुनावलं. शिवाय, त्याने युवराज आणि भज्जीसह त्याच्या मैत्रीवरही प्रश्न उपस्थित केला. पाकिस्तानकडून खेळलेल्या कनेरिया या हिंदु क्रिकेटपटूने आफ्रिदीने पाकिस्तान व्याप्त काश्मीरला (पीओके) दिलेल्या उत्तेजक भाषणाचा निषेध केला. (शाहिद आफ्रिदीच्या काश्मीर, पंतप्रधान मोदींवरील विवादित टिप्पणीवर गौतम गंभीर ने सुनावलं; युवराज, हरभजन सिंह यांना झाला पश्चात्ताप)

कनेरिया इंडिया टीव्हीला म्हणाला, "शाहिद आफ्रिदीने कोणत्याही बाबतीत बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. जर त्याला राजकारण करायचंय तर त्याने क्रिकेटशी संबंध तोडावे. राजकीय भाष्य करायचे असल्यास त्याने क्रिकेटपासून दूर राहावे. अशा भाषणामुळे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण देशातपाकिस्तान क्रिकेटची चुकीची प्रतिमा तयार होत आहे. कनेरियाने आफ्रिदीवर टीका केली आणि त्याच्या युवी व भज्जीसोबतच्या मैत्रीवर प्रश्न विचारला. कनेरिया म्हणाला,"एकीकडे युवराज आणि हरभजनकडून मदत मागायची आणि नंतर त्यांच्या देश व पंतप्रधानांवर टीका करायची, ही कसली मैत्री?"

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधील या भाषणा दरम्यान आफ्रिदीने क्रिकेटच्या अंतिम टप्प्यात पाकिस्तान सुपर लीगमध्ये काश्मीर संघाचे प्रतिनिधित्व करायचे असल्याचेही म्हटले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डला उद्देशून आफ्रिदी म्हणाला,"मी पीसीबीला विनंती करतो की पुढील वेळी पीएसएलमध्ये काश्मीर संघ तयार करावा. मला कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात त्या संघाचे नेतृत्व करायला आवडेल." आफ्रिदीच्या या वक्तव्यावर युवी आणि भज्जीऐवजी गौतम गंभीर, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी कसून टीका केली. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे असं म्हणत आफ्रिदीला खडेबोल सुनावले.