CSK vs DC IPL 2021 Match 2: दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यात कोण-कोणावर वरचढ, पहा दोन्ही संघाचे हे रेकॉर्ड
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

CSK vs DC IPL 2021 Match 2: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ आमने-सामने येतील. दोन विकेटकीपर-कर्णधारांच्या संघातील आजचा सामना रोमांचित होण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे. एकीकडे अनुभवी महेंद्र सिंह धोनी असेल तर दुसरीकडे युवा रिषभ पंत जो पहिल्यांदा आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे. दिल्ली संघाचे दोन स्टार बॉलर कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजे सामन्यात खेळू शकणार नसल्याने फायनलिस्ट संघासाठी आजचा सामना सामना कठीण होईल असे दिसत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली आणि चेन्नई दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये यलो आर्मीचे वर्चस्व दिसत आहे. दोन्ही संघामध्ये एकूण 23 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी दिल्ली संघाने फक्त 8 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे चेन्नई संघाने एकूण 15 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या मागील 5 सामने पाहिले तर चेन्नई इथे देखील दिल्लीवर भारी पडली आहे. चेन्नईने 3 सामन्यांत तर दिल्ली संघाने 2 सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. (IPL 2021: जोश हेझलवूडच्या जागी CSK ताफ्यात ‘या’ वेगवान ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा समावेश)

दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई आणि दिल्ली संघातील पहिला सामना रंगणार आहे. या स्टेडियमवर दोन्ही संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर धोनीच्या सुपर किंग्सचा वानखेडेवर दबदबा दिसत आहे. चेन्नईने या मैदानावर एकूण 30 सामने खेळले असून संघ 18 सामन्यात विजयी झाला आहे, 12 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दिल्ली संघाबद्दल बोलायचे तर त्यांनी या मैदानावर 28 सामन्यात 16 मॅचमध्ये विजय मिळवला तर 12 सामने गमावले आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरला खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली जो की हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्लीला मोठा धक्का ठरला. अशास्थितीत श्रेयसच्या अनुपस्थितीत युवा यष्टीरक्षक रिषभ पंतवर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे, आयपीएलच्या सर्वाधिक लोकप्रिय फ्रँचायझीमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा समावेश आहे आणि त्यांनी तीन वेळा जेतेपद जिंकले आहे. सीएसके आयपीएल 2020 मध्ये स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरली त्यामुळे यंदाच्या हंगामात ते गेल्या हंगामातील कामगिरी मागे सोडून यदां नवीन सुरुवात करू पाहत असतील.