Coronavirus: विराट कोहली ने COVID-19 च्या धोक्यात चाहत्यांना केले आवाहन, शेअर केला प्रेरणादायक संदेश
विराट कोहली (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर सध्या जगभर पसरला आहे. कोरोना विषाणूमुळे क्रिकेट आणि इतर खेळांवर परिणाम होत आहे. खेळांच्या तारखा एकतर पुढे ढकलल्या जात आहेत किंवा त्या रद्द केल्या जात आहेत. मात्र, या कठीण काळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सरसावला आहे. विराटने कोरोना विषाणूचा मजबूतीने सामना करण्यास सांगितले आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) मालिकेतील उर्वरित दोन एकदिवसीय सामने शुक्रवारी कोरोना विषाणूमुळे रद्द करण्यात आले. यापूर्वी भारतीय बोर्डाने 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलची तारीख देखील एक महिन्यासाठी पुढे ढकलली आहे. भारतात, कोविड-19 चे 80 प्रकरणासह दोन मृत्यू झाल्याने भारतीय बोर्डाने कठीण निर्णय घेतले आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिका आणि आयपीएलचे सामने प्रेक्षजनविना आयोजित केले जाण्याचे म्हटले जात होते. (AUS vs NZ 2020: न्यूझीलंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही Coronavirus चा प्रभाव, प्रवासी निर्बंधामुळे उर्वरित दोन ODI सामने पोस्टपोन)

मालिका रद्द झाल्यानंतर कोहलीने ट्विट केले आणि म्हटले की, "आपण सावधगिरीने कोरोना विषाणूविरूद्ध जोरदार लढा देऊ शकतो. उपचार करण्यापेक्षा खबरदारी घेणे चांगले. आपण सर्व स्वत: ची काळजी घ्या." शिवाय, शुक्रवारी भारतीय कर्णधार काळ्या रंगाचा मुखवटा घालून लखनऊ विमानतळाबाहेर पडताना दिसला. भारतीय संघाचे शनिवारी प्रशिक्षण सत्र असणार होते, पण भारत आणि दक्षिण आफ्रिका बोर्डाने एकमताने मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकी संघातील खेळाडूंनी लवकरात लवकर घरी परतण्याचे स्पष्ट केल्यावर बोर्डाने निर्णय घेतला.

भारत-दक्षिण आफ्रिकेमधील दोन सामने लखनऊ आणि कोलकातामध्ये आयोजित करण्यात येणार होते. गुरुवारी धर्मशालामधील पहिला वनडे सामना एका चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. बीसीसीआयने सांगितले की ते क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) सोबत काम करून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे पुढील वेळापत्रक निश्चित करतील. कोरोना विषाणूमुळे आयपीएलच्या 13 व्या सत्रावरही संकट ओढवले आहे. सध्याच्या बीसीसीआयने 13 वा हंगाम 29 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत स्थगित केला आहे, पण जर परिस्थिती तोवर सुधारली नाही तर यंदा स्पर्धा रद्द केली जाऊ शकते.