IND vs ZIM 2nd T20I: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs ZIM) दुसरा सामना आज म्हणजेच 7 जुलै रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. भारतीय संघाने हा सामना 100 धावांनी जिंकला. गेल्या सामन्यात याच टीम इंडियाला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाच्या विजयात अभिषेक शर्माची (Abhisekh Sharma) भूमिका खूप महत्त्वाची होती. या सामन्यात अभिषेक शर्माने शानदार शतक झळकावले. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) युवा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) खूपच आनंदी दिसत होता. यादरम्यान गिलने आपला सहकारी अभिषेक शर्माचे कौतुक करताना मन मोकळे केले. (हे देखील वाचा: Abhisekh Sharma Century: झिम्बाब्वेविरुद्ध अभिषेक शर्माचे धमाकेदार शतक, अनेक विक्रमांना घातली गवसणी)
विजयानंतर गिल काय म्हणाला?
शुभमन गिलने विजयानंतर सांगितले की, मी खूप आनंदी आहे, पुन्हा विजयी लयीत परतणे खूप छान आहे. अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, विशेषत: पॉवरप्लेमध्ये, ते सोपे नव्हते कारण चेंडू इकडे तिकडे फिरत होता, परंतु अभिषेक आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार खेळी केली. काल, दबाव हाताळू न शकण्याबद्दल अधिक होते, हा एक तरुण संघ आहे आणि त्यापैकी बरेच आंतरराष्ट्रीय अनुभवासाठी नवीन आहेत. पहिल्या गेममध्ये दडपण असणे खरोखरच चांगले होते आणि आम्हाला माहित होते की या सामन्यात काय होणार आहे. आम्हाला अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. पर्याय नसण्यापेक्षा अधिक पर्याय असणे केव्हाही चांगले.
कसा झाला सामना?
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात 20 षटकात केवळ 2 विकेट गमावत 234 धावा केल्या. भारताने दिलेल्या एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला झिम्बाब्वे संघ या सामन्यात सुरुवातीपासूनच पिछाडीवर दिसला आणि 18.4 षटकात 134 धावांवर सर्वबाद झाला. यासह टीम इंडियाने हा सामना जिंकला.