Happy Birthday Virat Kohli: 31 व्या वाढदिवसानिमित्त विराट कोहली याने लिहिली Life Lesson देणारी 'ही' खास पोस्ट, पाहा Tweet
(Photo Credit: Instagram/Getty)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज कोहलीला कोणत्याही परिचयाची गरज नाही आहे. जगातील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. 'रन मशीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या विराटने भारतीय क्रिकेटमध्येएक महत्वाचा ठसा उमटवला आहे आणि तो दिवसेंदिवस त्या दिशेने वाटचाल करत आहे. 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे जन्मलेला विराट हा तरुण खेळाडूंसाठी प्रेरणा आहे. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराटने आपल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. पण, क्रिकेटच्या या स्तरावर पोहचण्याची विराटचा प्रवास इतका सोप्पा नव्हता. सध्या क्रिकेटच्या शीर्ष स्थळी असलेल्या विराटलाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. आज वाढदिवसाच्या दिवशी विराट क्रिकेटमधून काही वेळ काढून भूतानला पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह सुट्टीवर आहे. (वाढदिवसानिमित्त अनुष्का शर्मा हिच्यासह विराट कोहली याची Bhutan स्वारी, अज्ञात कुटुंबाच्या भेटीचा अनुभव शेअर करत अनुष्काने भावनिक पोस्ट)

आज विराटचा 31 वा वाढदिवस आहे. या खास क्षणी विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात 15 वर्षीय विराटने स्वतःलाच एक पात्र लिहिले आहे. विराटने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "माझा प्रवास आणि जीवनाचे धडे मला 15 वर्षांचे असताना समजले होते. मी ते लिहण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा वाचा." या पोस्टमध्ये विराटने त्याच्या वडिलांचाही उल्लेख केला आहे. विराटने यात लिहिले की, पालक आम्हाला कधीकधी समजत नाहीत असे तुम्हाला वाटेल, पण त्यांचा आदर ठेवा आणि आपण त्यांच्याबरोबर जितका वेळ घालवू शकता तितका वेळ घालवा. "वडिलांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. खूप. आज त्याला सांगा. उद्या सांगा. त्याला अधिक वेळा सांगा." विराटचे वडील प्रेमनाथ कोहली यांचे 2006 मध्ये निधन झाले होते. कोहलीने आपल्या फलंदाजीच्या बळावर बरीच नावे मिळविली, यात 'रेकॉर्ड मशीन', 'रन मशीन' आणि 'किंग कोहली' अश्या नावांचा समावेश आहे. क्रिकेट कारकीर्दीत सर्वात वेगवान 10,000 वनडे धावा पूर्ण करणाऱ्या विराटने त्याच्या करिअरमध्ये जी उंची गाठली आहे  त्याची पुनरावृत्ती करणेकोणासाठीही फार कठीण आहे.

आज वनडे क्रिकेटमध्ये विराटने एकूण 43 शतकं केली आहेत आणि सर्वाधिक वनडे शतकांच्या विश्वविक्रमापासून तो फक्त 7 पाऊल दूर आहे. हा विक्रम अजूनही क्रिकेटचा भगवान म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.