IND vs SA 1st T20: कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी पहिला टी-20 सामना ठरणार मोठी डोकेदुखी, 'या' खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये मिळू शकते संधी
Team India (Photo Credt - Twitter)

IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्याच्या (IND vs SA) पार्श्वभूमीवर प्लेइंग इलेव्हनची निवड करणे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी (SuryaKumar Yadav) मोठी डोकेदुखी ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे. अलीकडे, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 4-1 ने जिंकली. टीम इंडियाला आता याच कामगिरीची पुनरावृत्ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत करायची आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबर रोजी डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जाईल. कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह भारत पहिल्या टी-20 मध्ये प्रवेश करतो ते पाहूया.

कोण येणार सलामीली?

यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीसाठी मैदानात उतरवले जाऊ शकते. हे दोन्ही फलंदाज पहिल्या 6 षटकात धावा करण्यात माहीर आहेत. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे अगदी काही चेंडूतही सामन्याचे वळण लावण्यात पटाईत आहेत. यशस्वी जैस्वालने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांमध्ये 27.60 च्या सरासरीने 138 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांमध्ये 55.75 च्या सरासरीने 223 धावा केल्या होत्या.

मध्यम क्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. फिनिशर रिंकू सिंगला पाचव्या क्रमांकावर संधी मिळण्याची खात्री आहे. यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा सहाव्या क्रमांकावर खेळेल. म्हणजे शुभमन गिल, टिळक वर्मा आणि इशान किशन यांना फलंदाजी क्रमवारीत स्थान मिळत नाही.

कोण असणार अष्टपैलू खेळाडू?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळण्याची खात्री आहे. या टी-20 मालिकेत रवींद्र जडेजा भारताचा उपकर्णधार आहे. रवींद्र जडेजा टीम इंडियाला फिरकी गोलंदाजीसोबत फलंदाजीतही मजबूत करेल. अशा स्थितीत वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल. (हे देखील वाचा: IND vs SA 1st T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी, डर्बनमध्ये पाऊस पडण्याची शक्यता)

फिरकी आणि वेगवान गोलंदाजी विभाग

लेगस्पिनर रवी बिश्नोईचा फिरकी गोलंदाजी विभागात समावेश केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव वेगवान गोलंदाजांपैकी दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांना संधी देईल. कर्णधार सूर्यकुमार यादव वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवू शकतो.

पहिल्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.