IND vs PAK (Photo Credit - Twitter)

IND vs PAK: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या सामन्यावर रद्द होण्याची टांगती तलवार आहे, कारण त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. दोन्ही संघांमध्ये १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. मात्र, आता हे प्रकरण कोर्टात पोहोचल्याने सामन्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (हे देखील वाचा: BAN vs UAE Asia Cup Live Streamimg: 11 वर्षांनंतर बांगलादेश-हाँगकाँग आमनेसामने; असा मोफत पाहता येईल लाईव्ह सामना)

भारत-पाक सामना रद्द करण्याची याचिका दाखल

लॉचे चार विद्यार्थी, उर्वशी जैन, स्नेहा रानी अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशाचे हित आणि आपले प्राण गमावलेल्या भारतीय सैनिक आणि नागरिकांचा सन्मान लक्षात घेऊन भारत-पाकिस्तान सामना होऊ नये. त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, 'क्रिकेटला कधीही देशापेक्षा वर ठेवता येणार नाही'. त्यांनी कोर्टाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. देशाची सुरक्षा आणि लोकांच्या भावनांचा मुद्दा या याचिकेमध्ये मांडण्यात आला आहे, ज्यामुळे आशिया कपमधील सर्वात मोठ्या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

भारतीय संघाने केली दमदार सुरुवात

२०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने १० सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना यूएईविरुद्ध दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला. या सामन्यात यूएईचा डाव अवघ्या ५७ धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने ४ आणि शिवम दुबेने ३ विकेट्स घेतल्या. विजयासाठी ५८ धावांचे सोपे लक्ष्य भारतीय संघाने अवघ्या ४.३ षटकांत १ विकेट गमावून सहज गाठले. भारताचा पुढील सामना आता पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच हा सामना होणार की रद्द होणार, हे अवलंबून आहे.