
भारताचा दिग्गज कसोटी फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhimn Saha) याला बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly), मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्यावरील विवादित टिप्पणी चांगलीच महागात पडणार आहे. केंद्रीय कराराच्या कलमाचा भंग केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) साहा याची चौकशी करणार आहे. साहाने अलीकडेच भारतीय क्रिकेटच्या वरील त्रिकुटावर झालेली चर्चेबद्दल जाहीरपणे सांगितली होती. मोहाली येथे 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या सुरु श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी (Sri Lanka Test Series) साहाला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. स्पोर्टस्टारला दिलेल्या एका मुलाखतीत, अनुभवी यष्टिरक्षकाने खुलासा केला होता की, गांगुलीने त्याला गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीनंतर तो भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय समितीमध्ये कारभार पाहत नाही तोपर्यंत संघातील त्याच्या स्थानाची काळजी करू नका असे सांगितले होते. (Wriddhiman Saha vs Journalist: ‘धमकी दिलेल्या’ पत्रकाराचे नाव उघड न करण्यावर दिग्गज फलंदाज ठाम, विवादित प्रकरणी केले धक्कादायक विधान)
याशिवाय 37 वर्षीय फलंदाजाने पुढे खुलासा केला की द्रविडने त्याला निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले तर शर्माने त्याला सांगितले की भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर यापुढे निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) च्या अहवालानुसार, बीसीसीआय साहा याला त्यांच्या टिप्पण्यांवर जाब विचारेल, कारण त्याने बीसीसीआयच्या खेळाडूंसाठीच्या केंद्रीय कराराच्या कलम 6.3 चे उल्लंघन केले आहे. या कलमानुसार “खेळाडूने खेळ, अधिकारी, खेळात घडलेल्या घटना, तंत्रज्ञानाचा वापर, निवडीबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये किंवा खेळाशी संबंधित इतर कोणतीही बाब जी बीसीसीआयच्या मते कोणत्याही माध्यमात खेळ, संघ किंवा बीसीसीआयच्या हितासाठी प्रतिकूल आहे आणि/किंवा नाही.”
“होय, अशी शक्यता आहे की बीसीसीआय रिद्धिमानची चौकशी करू शकते की तो केंद्रीय करारबद्ध क्रिकेटपटू म्हणून निवडीच्या विषयांवर कसा बोलला. जोपर्यंत अध्यक्षांचा प्रश्न आहे, त्यांनी त्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला होता. प्रशिक्षक द्रविडसोबतच्या ड्रेसिंग रूमच्या संभाषणातून तो कशामुळे सार्वजनिक झाला हे बोर्डाला जाणून घ्यायला आवडेल. दरम्यान बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयला सांगितले की, “आम्ही अद्याप या विषयावर निर्णय घेतलेला नाही. आम्ही सर्व व्यस्त आहोत, परंतु काही दिवसांनी अंतिम निर्णय घेतला जाईल.”