राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या (Team India) प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंड मालिकेपासून तो ही जबाबदारी सांभाळत आहे. राहुल यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (National Cricket Academy) प्रमुख म्हणून काम पाहत होते. आता ही जबाबदारी राहुलचा माजी सहकारी आणि भारताचे दिग्गज फलंदाज व्हीव्हीस लक्ष्मण (VVS Laxman) यांना सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) या बाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पीटीआय, या वृत्तसंस्थेशी बोलताना एनसीएचे पुढील अध्यक्ष लक्ष्मण असतील असे सांगितले आहे. राहुल आणि लक्ष्मण भारतीय क्रिकेटमधील दोन प्रभावशाली पदांवर काम करतील याचा गांगुलीला खूप आनंद आहे. या दोघांच्या आगमनाने भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात असल्याचे ते म्हणाले. लक्ष्मणला एनसीएचे अध्यक्ष बनण्यासाठी कोणती किंमत मोजावी लागेल हेही गांगुलीने सांगितले. त्यांनी म्हटले की लक्ष्मण आणि त्यांचे कुटुंब पुढील तीन वर्षांसाठी हैदराबादहून बेंगलोर येथे स्थायिक होतील. (BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ‘शिक्कामोर्तब’, राहुल द्रविड यांच्यानंतर माजी दिग्गज VVS लक्ष्मण बनणार NCA प्रमुख; IPL फ्रँचायझीला केला गुड-बाय)
गांगुलीने पीटीआयला सांगितले की, “मला खूप आनंद झाला की त्यांची मुख्य प्रशिक्षक आणि एनसीए प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. दोन्ही भारतीय क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाची पदे आहेत.” दोघांचे मन वळवणे किती कठीण होते असे विचारल्यावर गांगुली म्हणाले, “त्यांना हे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांनी ते मान्य केले. दोघांची नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे आणि भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात आहे. मला आनंद आहे की दोघांनीही सहमती दर्शवली आहे आणि त्यांना हे भारतीय क्रिकेटसाठी करायचे आहे.”
गांगुली म्हणाले की एनसीए प्रमुख म्हणून लक्ष्मणच्या आगमनाने मोठा फरक पडेल कारण तो एक अद्भुत व्यक्ती आहे आणि भारतीय क्रिकेटमध्ये त्याचा उच्च दर्जा आहे. “लक्ष्मणच्या वचनबद्धतेमुळे त्याची निवड केली जाईल. त्याच्यासोबत काम करणे नेहमीच छान असते. भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे मोठे स्थान आहे. राहुलने एनसीएमध्ये एक यंत्रणा बनवली आहे आणि लक्ष्मण ती सुरू ठेवणार आहे. भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी तो पुढील तीन वर्षांसाठी हैदराबादहून बेंगलोरला स्थलांतरित होत आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. त्याची कमाई कमी होईल पण तरीही तो तयार आहे. त्याची बायको आणि मुलंही शिफ्ट होतील. त्याचे मुले आता बंगलोरमध्ये शिकणार आहेत आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेणे कुटुंबासाठी एक मोठा बदल असेल. जोपर्यंत तुम्ही भारतीय क्रिकेटला समर्पित होत नाही तोपर्यंत हे करणे सोपे नाही.”