निक लार्किनच्या टी-शर्टमध्ये घुसला बॉल (Photo Credit: Twitter/BBL)

BBL 2020-21: ऑस्ट्रेलियामध्ये सध्या भारताविरुद्ध मालिकेसह बिग बॅश लीगचा (Big Bash League) देखील धमाल सुरु झाला आहे. जगातील अनेक मोठे क्रिकेटपटू या लीगमध्ये भाग घेत आहेत. या लीगमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील धमालसह मैदानावर अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत, ज्या लोकांना बर्‍याच काळापर्यंत लक्षात राहिल्या आहेत. मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) आणि सिडनी थंडर (Sydney Thunders) यांच्या शनिवारी झालेल्या सामन्या दरम्यान अशीच एक विचित्र घटना पाहायला मिळाली जेव्हा चेंडू काही वेळासाठी गायब झाला. ही घटना मेलबर्नच्या डावातील 20व्या ओव्हरमधील आहे. अंतिम ओव्हरमध्ये डॅनियल सॅम्सच्या (Daniell Sams) चेंडूवर Nick Larkin याने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. सॅम्सने फेकलेला चेंडू फलंदाजाच्या टी-शर्टमध्ये जाऊन अडकला, पण ही गोष्ट फलंदाजाला समजली नाही आणि तो धाव घेण्यासाठी धावला.

निक जेव्हा चोरटी धाव घेण्यासाठी धावला, अर्धी खेळपट्टी पार केल्यावर चेंडू त्याच्या जर्सीमधून खाली पडला. दरम्यान मैदानातील सर्वजण, क्षेत्ररक्षक ते फलंदाज, भाष्यकारही आणि नंतर प्रेक्षकही चेंडू शोधू लागले. नंतर लोकांना कळले की चेंडू निकच्या जर्सीत गेला आहे. हे कळताच अगदी फलंदाजालाही हसू अनावर झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून टीव्हीवर भाष्य करणारे अ‍ॅडम गिलक्रिस्ट यांनाही हसू अनावर झाले. "बॉल लपवा आणि धावत जा! निक लार्किन कडून थोडी लबाडी," बीबीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले.

दरम्यान, नंतर नियमांनुसार अंपायरने चेंडूला डेड बॉल म्हटले. पुढच्याच चेंडूवर निक लार्किन स्लो चेंडूवर बोल्ड झाला आणि 15 धावांची खेळी करत माघारी परतला. या सामन्यात मेलबर्न संघाने पहिले फलंदाजी करताना सिडनीसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात सिडनी संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 147 धावाच करू शकला. मार्कस स्टोइनिस मेलबर्नच्या विजयाचा नायक ठरला. त्याने सलामीला येत 37 चेंडूत 61 धावा केल्या. याशिवाय लाइम हॅचरने 28 धावा देत 3 विकेट घेतल्या.