PC-X

Bangladesh National Cricket Team vs Zimbabwe National Cricket Team 1st Test 2025 Day 4 Scorecard: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर यजमान संघाने 57 षटकांत 4 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी जेवणाच्या विश्रांतीआधी, बांगलादेशचा संघ 79.2 षटकांत 255 धावांवर सर्वबाद झाला. यासह यजमान संघाने झिम्बाब्वेला 174 धावांचे लक्ष्य दिले. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक धावा केल्या. नजमुल हुसेन शांतोने 105 चेंडूत 60 धावा केल्या. याशिवाय मोमिनुल हकने 47 धावा आणि जकार अलीने 58 धावांचे योगदान दिले. तर महमुदुल हसन जॉयने 33 धावा केल्या. तर अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीमची बॅट चालली नाही. त्याला फक्त 4 धावा करता आल्या.

दुसऱ्या डावात झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझारबानीने शानदार गोलंदाजी केली. त्याने 20.2 षटकांत 72 धावा देत 6 बळी घेतले. याशिवाय वेलिंग्टन मसाकाड्झाने 2 विकेट घेतल्या. तर व्हिक्टर न्याउची आणि रिचर्ड नगारावा यांनी 1-1 विकेट घेतली. सध्या झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 174 धावांची आवश्यकता आहे.

बांगलादेशचा पहिला डाव 191 धावांवर संपला

पहिल्या दिवशी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यजमान संघ 61 षटकांत 191 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 56 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी आणि वेलिंग्टन मसाकादझा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले.

झिम्बाब्वे पहिला डाव

प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा पहिला डाव 80.3 षटकांत 273 धावांवर संपुष्टात आला. पाहुण्या संघाकडून शॉन विल्यम्सने सर्वाधिक 59 धावा केल्या. याशिवाय ब्रायन बेनेटने 57 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना मेहदी हसन मिराजने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर नाहिद राणाने तीन विकेट घेतल्या.