AUS vs NZ: ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसनची करण्यात आली कोरोनाव्हायरस टेस्ट, Cricket Australia निकालाच्या प्रतीक्षेत
केन रिचर्डसन (Photo Credit: IANS)

क्रिकेटपटूही कोरोना विषाणूच्या प्रभावात येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनची (Kane Richardson) कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली आहे. यामुळे रिचर्डसन न्यूझीलंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळू शकणार नाही. रिचर्डसन यावर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणार आहे. रिचर्डसनमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणं दिसून आल्याने त्याची तपासणी करण्यात आली आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. त्याला टीमपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया संघ नुकताच दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरुन परतला आहे. आजपासून ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सिडनी क्रिकेट मैदानावर पोहोचला तेव्हा आज केन त्यांच्या सोबत नव्हता.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार 29 वर्षीय रिचर्डसनने गुरुवारी रात्री टीम डॉक्टरांकडे घसा खवखवण्याची तक्रार केली होती. ज्यानंतर कोविड-19 च्या चाचणीसाठी त्याचा नमुना घेण्यात आला. सध्या त्याच्या चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा केली जात असून अहवाल नकारात्मक आल्यास तो त्वरित संघात सामील होईल. रिचर्डसनची टेस्ट आफ्रिका दौर्‍यावरुन परतल्यानंतर करण्यात आली आहे.  कोरोनाव्हायरसच्या प्रसारामुळे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना आयोजित करण्यात येत आहे. ज्यांनी सामन्याची तिकिटं विकत घेतले त्यांना पैसे परत केले जातील. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी केनच्या जागी सीन एबॉटला स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, हजारो लोकांना प्रभावित करण्याव्यतिरिक्त, या विषाणूमुळे 4000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर खेळाचे बहुतेक सामने एकतर रद्द केले गेले किंवा बंद दाराच्या मागे म्हणजेच प्रेक्षकांविना आयोजित करण्यात येत आहेत.